‘मधुबाला’ व ‘शक्ति: अस्तित्व के एहसास की’ या मालिकांमधून अभिनेता विवियन डिसेनाला लोकप्रियता मिळाली. ‘उडारियां’, ‘बिग बॉस’मध्ये झळकलेला विवियन डिसेना अलीकडच्या काही वर्षांत त्याच्या व्यावसायिक नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला. विवियनचा पहिला घटस्फोट, त्यानंतर त्याचं इस्लाम स्वीकारणं आणि २ मुलींची आई असलेल्या महिलेशी दुसरं लग्न करणं या गोष्टींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विवियन डिसेनाच्या मालिका व रिअॅलिटी शो
विवियन डिसेनाने ‘प्यार की ये एक कहानी’, ‘मधुबाला – एक इश्क एक जुनून’ आणि ‘शक्ती – अस्तित्व के एहसास की’ यांसारख्या सुपरहिट मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्याने ‘झलक दिखला जा ८’ आणि ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ७’ मध्येही भाग घेतला होता. २०२४-२५ मध्ये तो ‘बिग बॉस १८’ मुळे प्रचंड चर्चेत राहिला.
विवियन डिसेनाचं पहिलं लग्न
विवियन डिसेनाने पहिलं लग्न अभिनेत्री वाहबीज दोराबजीबरोबर केलं होतं. विवियन आणि अभिनेत्री वाहबीज यांची भेट ‘प्यार की ये एक कहानी’च्या सेटवर झाली. पुढे ते मित्र झाले, त्यांच्यात जवळीच वाढली आणि प्रेमात पडले. २०१३ मध्ये त्यांनी लग्न केलं. काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि २०१६ पासून ते वेगळे राहू लागले. दीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर, २०२१ मध्ये त्यांचा अधिकृतपणे घटस्फोट झाला.
विवियन डिसेनाने स्वीकारला इस्लाम
ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या विवियनने इस्लाम धर्म स्वीकारला. २०१९ पासून इस्लाम धर्माचे पालन करत असल्याचं विवियनने एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्याने रमजानबद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. “मी दरवर्षी रोजे ठेवतो. मी आजारी नसेल तर पूर्ण ३० दिवस रोजे ठेवण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासाठी पाणी आणि कॉफी खूप आवश्यक गोष्टी होत्या, त्यामुळे मी त्याशिवाय कसा राहू शकेन, असं मला आधी वाटायचं. माझे कुटुंबीय व मित्रही विचार करायचे की मी पाणी व कॉफीशिवाय १२-१४ तास कसा राहू शकतो. पण रोजे करण्याचा माझा प्रवास खूप चांगला असतो, मला काहीच त्रास होत नाही,” असं विवियन डिसेना म्हणाला होता.
“माझ्या आयुष्यात फारसे बदल झालेले नाहीत. माझा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला होता, पण आता मी इस्लामचे पालन करतो. मी २०१९ च्या रमजान महिन्यापासून दिवसातून पाच वेळा नमाज पठण करण्यास सुरुवात केली आहे,” असंही विवियन म्हणाला होता. नमाज पठण करून मानसिक शांतता मिळाल्याचं त्याने नमूद केलं होतं.
विवियन डिसेनाचं दुसरं लग्न
विवियन डिसेनाने दोन मुलींची आई असलेल्या परदेशी पत्रकार नूरन अलीशी दुसरं लग्न केलं. विवियनची पत्नी नूरन अली ही इजिप्तची माजी पत्रकार आहे. एका मुलाखतीच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली होती. विवियनने नूरनशी इजिप्तमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं. सुरुवातीला त्याने हे लग्न लपवून ठेवलं होतं, पण २०२३ मध्ये त्याने स्वतः या लग्नाची कबुली दिली. विवियन आणि नूरन यांना एक मुलगी आहे, जिचे नाव लायन विवियन डिसेना आहे.
