Manasi Salvi Mahadev and Sons serial controversy : मानसी साळवी हिंदी व मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या ‘महादेव अँड सन्स’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. परंतु, ही मालिका सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी मानसी साळवी शो सोडणार असल्याच्या बातम्या समोर आल्या. सुरुवातीला तिच्या कामाचे दिवस कमी करण्यात आल्यामुळे ती बाहेर पडत आहे, असं म्हटलं जात होतं. पण आता स्वत: मानसीने याबद्दल प्रतिक्रिया देत यामागचं खरं कारण सांगितलं आहे. 

‘फ्री प्रेस जर्नल’शी संवाद साधताना मानसीने याबद्दलची सगळी माहिती दिली आहे. मानसीच्या म्हणण्यानुसार, तिने पॅरिन मल्टिमीडियाचे सौरभ तिवारी आणि ‘कलर्स’मधील तिच्या नेटवर्क हेडला ईमेल करून १५ मेपर्यंत शो सोडायची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांनी तिच्या ईमेलला काहीच उत्तर मिळाले नाही.

माणसीला शो सोडायचा होता कारण – अनेक वेळा निर्मात्याने तिला मेसेज आणि व्हॉइस नोट्स पाठवून चॅनेलला ती किंवा तिचं पात्र नको आहे, असं सांगितलं. फक्त तोच तिची बाजू घेतोय  आणि त्यामुळेच तिला एपिसोडमध्ये थोडाफार स्क्रीन टाईम मिळत आहे असंही तिला सांगितलं जात होतं, पण तिच्याकडे असेही मेसेज आहेत ज्यातून निर्माता तिला चॅनेल तिच्याविरोधात आहे, अशा गैरसमजात अडकवण्याचा प्रयत्न करत होता. मानसीने सांगितलं की, सात महिन्यांपर्यंत तिच्याबरोबर असा प्रकार सुरू होता आणि तिच्या शूटिंगच्या तारखाही नीट जुळवून घेतल्या जात नव्हत्या.

१५ मे रोजी शो सोडणार असल्याचं तिने अधिकृत ईमेलद्वारे कळवल्यानंतर, मानसीला वाटलं होतं की निर्मिती संस्थेकडून तिला करारामुळे लगेच शो सोडू शकत नाहीस असं उत्तर येईल, पण त्याऐवजी तिला असा ईमेल आला की, ‘महादेव अँड सन्स’ या शोमध्ये तुमच्याबरोबर काम करण्याचा अनुभव आनंददायी होता. आम्ही १५ मेपूर्वी तुमचं काम पूर्ण करू. कृपया तुमच्या कराराची साइन केलेली प्रत आमच्या ऑफिसमधून प्रोड्युसरकडून घ्या. हा ईमेल तिला २१ एप्रिल रोजी पाठवण्यात आला होता.

नेमकं काय घडलं?

मानसी तिच्याबरोबर घडलेल्या या प्रकाराबद्दल म्हणाली, “१ मे रोजी, म्हणजे मी शो सोडण्याचा ईमेल पाठवून ११ दिवसांनी, मला आणखी एक ईमेल आला. त्यात त्यांनी आधीचा मेल मागे घेत असल्याचं आणि जुना करार पुन्हा लागू करत असल्याचं म्हटलं, पण हे कायद्याच्या दृष्टीने योग्य नाही. माझ्या वकिलांनी त्याच दिवशी उत्तर देऊन हे बेकायदेशीर असल्याचं सांगितलं.”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “आज ५ मे आहे, पण अजूनही निर्मात्याने माझ्या मेलला उत्तर दिलेलं नाही. उलट त्यांनी मीडियात, प्रोड्युसर्स असोसिएशन आणि आर्टिस्ट्स असोसिएशनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपली बाजू मांडत बोलणं सुरू केलं आहे. निर्मात्याने तथ्यांमध्ये बदल करून चुकीची माहिती पसरवली आहे, म्हणून आम्ही त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करत आहोत. कायदेशीर प्रक्रियेबद्दल मीडियामध्ये सविस्तर बोलणं माझ्यासाठी कठीण आहे, पण आता माझ्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही” असं मानसीने उल्लेख केलेल्या माध्यमाशी संवाद साधताना सांगितलं आहे.

यानंतर मानसीने तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न कसा करण्यात आला, करारातील गुंतागुंतीचे कायदेशीर मुद्दे काय आहेत आणि कायदेशीर कारवाई करणं का गरजेचं आहे याबद्दलही सविस्तर माहिती दिली.  मानसी म्हणाली, “मला आता असं जाणवलं आहे की चालू असलेल्या कायदेशीर प्रकरणात शांत राहणं हे सन्मान किंवा संयम मानलं जात नाही. उलट ते कमजोरी समजलं जातं आणि त्यामुळे चुकीच्या गोष्टी पसरायला वाव मिळतो. त्यामुळे माझ्या वकिलांच्या सल्ल्याने, खरं काय आहे ते स्पष्टपणे सांगणं गरजेचं वाटतं. असा समज असतो की कलाकार व्यावसायिक नसतात आणि निर्मात्यांच्या कायदेशीर दबावाखाली येतात, पण आता काळ बदलला आहे. जशी निर्मिती संस्थांकडे त्यांच्या बाजूने कायदेशीर गोष्टींची मदत घेण्याची मुभा असते, तसंच आजकाल कलाकारही योग्य कायदेशीर सल्ला घेतात, ज्यामुळे करार आणि त्यातून बाहेर पडण्याची प्रक्रिया नैतिक आणि कायदेशीर पद्धतीने हाताळली जाते.”

मानसी पुढे म्हणाली, “एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कलाकारांना मुख्य भूमिकेसाठी २६ दिवस काम करण्याच्या अटीवर करार केला जातो, पण प्रत्यक्षात त्यांचा वापर खूपच कमी दिवसांसाठी केला जातो. माझ्या बाबतीत तर फक्त १० दिवस. तरीही करारातील ‘एक्सक्लुझिव्हिटी’मुळे आम्हाला दुसरं काम करता येत नाही. ही गोष्ट ना योग्य आहे, ना व्यावसायिक. माझ्या तीन दशकांच्या कारकिर्दीत, मी नेहमी एका वेळी एकच प्रोजेक्ट करण्याचा नियम पाळला आहे, करारात काय आहे याची पर्वा न करता. हा माझा नियम आजही तसाच आहे. निर्माता आपल्या सोयीने एक्सक्लुझिव्हिटी कमी-जास्त करू शकत नाही आणि तरीही कलाकाराकडून तितकीच बांधिलकी अपेक्षित ठेवू शकत नाही.”

अभिनेत्री पुढे असंही म्हणाली की, “माझ्याकडे असे अनेक मॅसेज आहेत ज्यातून दिसतं की शोच्या मूळ तेलुगू फॉरमॅटनुसार माझ्या भूमिकेला मुद्दाम कमी केलं जात होतं. जर असं होत असेल, तर मग सुरुवातीला मला मुख्य भूमिकेसाठी का घेतलं आणि तसंच प्रमोट का केलं, हा प्रश्न मला पडतो”.