Shraddha Nigam Karan Singh Grover First Wife: ९० च्या दशकातील प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री श्रद्धा निगम हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. ‘चूडियां’ आणि ‘कृष्णा अर्जुन’ या लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली श्रद्धा वैयक्तिक आयुष्यामुळे तुफान चर्चेत आली. अभिनेता करण सिंह ग्रोव्हरशी झालेले तिचे पहिले लग्न अवघ्या १० महिन्यांत संपुष्टात आले होते. घटस्फोटाच्या धक्कादायक प्रसंगातून बाहेर पडत श्रद्धाने दुसरे लग्न केले. आज अभिनयापासून दूर असलेली श्रद्धा काय करते? ते जाणून घेऊयात.
आज श्रद्धा निगमचा ४७ वा वाढदिवस आहे. तिचा जन्म इंदूरमध्ये १ ऑक्टोबर १९७९ रोजी झाला. तिने शालेय शिक्षण इंदूरमधून पूर्ण केलं आणि नंतर पुण्याला आली. पुण्यात श्रद्धाने फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. २००० साली तिने ‘चूडियां’ नावाची मालिका केली. त्यात तिने वृषाली नावाची भूमिका साकारली होती.मग श्रद्धाने ‘कहानी घर घर की’, ‘कृष्णा अर्जुन’ व ‘मानो या ना मानो’सारख्या मालिका केल्या.
श्रद्धा निगम -करण सिंह ग्रोव्हरचं लग्न व घटस्फोट
श्रद्धा निगमने दोनदा लग्न केलं. श्रद्धा निगमने पहिलं लग्न अभिनेता करण सिंह ग्रोव्हरशी केलं. पण त्यांचं लग्न वर्षभरही टिकलं नाही. २००९ साली अवघ्या १० महिन्यांत त्यांचा घटस्फोट झाला. त्यावेळी करणचं नाव ‘झलक दिखला जा’ शोची कोरिओग्राफर निकोलशी जोडलं गेलं होतं, त्याचदरम्यान त्यांचा संसार मोडला.
श्रद्धा निगमचं दुसरं लग्न
श्रद्धा निगमने २०१२ मध्ये आर्किटेक्चर असलेल्या मयंक आनंदशी दुसरं लग्न केलं. आता ती पतीबरोबर सुखाचा संसार करतेय. दुसरीकडे, करणने श्रद्धाला घटस्फोट दिल्यानंतर २०१२ साली जेनिफर विंगेटशी दुसरं लग्न केलं, पण त्यांचा घटस्फोट झाला. मग त्याने अभिनेत्री बिपाशा बासूशी २०१६ साली तिसरं लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे.
श्रद्धा निगम आता काय करते?
श्रद्धा निगम बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. आता ती पती मयंक आनंदबरोबर मिळून फॅशन डिझायनिंगचं काम करतेय. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती फोटो व व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
