Who is Pranit More 370 biryani controversy : बिग बॉस फेम स्टॅण्ड-अप कॉमेडियन प्रणित मोरे हा जोरदार चर्चेमध्ये आला आहे. सोशल मीडियावर ३७० रुपयांची बिर्याणी आणि त्यावर दिलेली प्रतिक्रिया यांमुळे प्रणित मोरेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. नेटकरी आणि कलाकारांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे प्रणित सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. प्रेक्षक म्हणून आलेल्या हिमांशु जांगराने वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे त्याची नोकरी गेली असून, प्रणितसुद्धा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आहे. सोशल मीडियावर आता ट्रोल होत असलेल्या प्रणितचा चाहतावर्गसुद्धा मोठा आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या प्रणितला ‘हिंदी बिग बॉस १९’ने घराघरात ओळख मिळवून दिली.
स्टॅण्ड-अप कॉमेडियन प्रणित मोरे रेडिओ जॉकी, यूट्यूबर असून, तो देशातील विविध भागांमध्ये इव्हेंट घेत असतो. मराठी आणि हिंदी भाषेतील त्याचे स्टॅण्ड-अप कॉमेडियन शो लोकप्रिय आहेत. शोमध्ये आलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधून आणि त्यावर प्रतिक्रिया देत प्रणित कॉमेडी करतो. त्याची खास संवादात्मक शैली, ऑन टाईम विनोद व पंचलाइन्स ही त्याच्या विनोदाची वैशिष्ट्ये आहेत.
सोशल मीडियामुळे प्रणितची लोकप्रियता वाढली
मध्यमवर्गीय कुटुंबातील गमती-जमती, नातेसंबंध आणि समाजातील विविध प्रसंग यांवर प्रणित कॉमेडी करत असतो. या कॉमेडी शोचे व्हिडीओ तो यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर शेअर करीत असतो. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या व्हिडीओमुळे प्रणित मोरे कॉमेडी क्लबपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण देशभरातील तरुणाईपर्यंत पोहोचला आहे.
प्रणित मोरेचा जन्म २ मार्च १९९१ रोजी झाला आणि त्याचे बालपण मुंबईमध्ये गेले. प्रणितने बीएमएस केले आणि त्यानंतर मार्केटिंगमध्ये एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. कॉमेडी क्षेत्रात येण्यापूर्वी त्याने कार शोरूममध्ये सेल्स विभागामध्ये काम केले होते. त्यानंतर तो रेडिओ क्षेत्राकडे वळला आणि ‘रेडिओ मिर्ची’मध्ये तो आरजे (रेडिओ जॉकी) म्हणून काम करीत होता. त्याच काळात प्रणितची खास विनोदी शैली प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्याने ओपन माइक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि तिथून प्रणित मोरेचा स्टॅण्ड-अप कॉमेडियन म्हणून प्रवास सुरू झाला. कॉमेडी शो केल्यानंतर त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले गेले. त्यानंतर प्रणित लोकप्रिय झाला. प्रणितला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख मिळाली.
बिग बॉसमुळे प्रणितची घराघरात ओळख
मग प्रणित मोरेला संपूर्ण देशामध्ये बिग बॉसने ओळख मिळवून दिली. प्रणित मोरे बिग बॉस १९ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आणि त्याची ओळख संपूर्ण देशामध्ये निर्माण झाली. ज्यांना त्याची स्टॅण्ड-अप कॉमेडी माहीत नव्हती असे लोकसुद्धा प्रणितचे चाहते झाले. त्याचा बिग बॉस हिंदीमधील प्रवास अतिशय रंजक ठरला. बिग बॉसमुळे प्रणित घराघरामध्ये ओळखला जाऊ लागला आणि त्याच्या करिअरला नवी दिशा मिळाली. मात्र आता प्रणित मोरे हा ३७० रुपयांची बिर्याणी वसूल केल्याच्या वादग्रस्त वक्तव्यावर हसल्यामुळे वादामध्ये अडकला आहे. अनेक कलाकार व सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया देत अशा वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.
नेमका काय आहे ‘३७० रुपये बिर्याणी’ वाद?
प्रणित मोरेच्या एका स्टँड-अप शोदरम्यान, प्रेक्षकांमध्ये हिमांशु जांगरा या तरुणाने त्याचा एक किस्सा सांगितला होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि त्यावर हसल्यामुळे प्रणितला ट्रोल करण्यात आले. हिमांशुने सांगितले की, तो एका मुलीला डेटवर घेऊन गेला. तिथे त्यांनी ३७० रुपयांची बिर्याणी खाल्ली, ज्याचे बिल त्या तरुणाने भरले. त्यानंतर ती मुलगी घरी जात होती; पण त्या मुलाला बिर्याणीचे पैसे वसूल करायचे होते. इथे पैसे वसूल करण्याचा अर्थ म्हणजे त्याला तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवायचे होते. तो हे सांगत असताना उपस्थित सर्व जण हसतात आणि प्रणित मोरेदेखील यावर प्रतिक्रिया देत याला ‘पीक गुरुग्राम कंटेंट’ म्हणतो. यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे अनेकांनी प्रणितवर नाराजी व्यक्त करीत त्याला ट्रोल केले आहे.
