Reena Kapoor News: ‘वो रहने वाली महलों की’ या मालिकेतील निरागस ‘राणी’ म्हणजेच अभिनेत्री रीना कपूर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. १९९० पासून अभिनय क्षेत्रात सक्रिय असलेल्या रीनाने ‘विष्णु पुराण’ ते ‘क्या कहना’ आणि शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ सारख्या चित्रपटांत काम करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, यशाच्या शिखरावर असतानाही वैयक्तिक आयुष्यात रीनाने अनेक चढ-उतार पाहिले. पायलट पती करण निझेल यांच्याशी अरेंज मॅरेज केल्यानंतर रीनाचे आयुष्य सुखात सुरू होते, पण लग्नाच्या २१ वर्षांनंतरही तिच्या पदरात मातृत्वाचं सुख पडू शकलं नाही. दोन वेळा गर्भपात झाल्याच्या धक्कादायक अनुभवानंतर रीनाने आई होण्याचा विचार कायमचा सोडून दिला.

‘वो रहने वाली महलों की’ या मालिकेमुळे टीव्ही अभिनेत्री रीना कपूरला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तिच्या निरागसतेवर प्रेक्षक फिदा होते. एकेकाळी तिचे नाव टीव्हीवरील टॉप अभिनेत्रींच्या यादीत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. रीना कपूर सध्या कुठे आहे आणि काय करत आहे, हे आपण जाणून घेऊया.

रीना कपूरने १९९० मध्ये ‘ये हुई ना बात’ या मालिकेतून आपल्या अभिनय करिअरला सुरुवात केली होती. या काळात तिने ‘परिवर्तन’, ‘आहट’, ‘रिश्ते’, ‘जय लक्ष्मी’ आणि ‘विष्णु पुराण’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. पण तिला खरी ओळख २००५ मध्ये आलेल्या ‘वो रहने वाली महलों की’ या मालिकेतून मिळाली. या शोमध्ये रीनाने ‘राणी’ची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर तिने अनेक चित्रपटांतही काम केलं.

रीना कपूरचे चित्रपट

अरशद वारसी आणि नम्रता शिरोडकर यांच्या १९९८ मध्ये आलेल्या ‘हीरो हिंदुस्तानी’ चित्रपटात रीना यांनी ‘आसमां’ नावाची भूमिका केली होती. त्यानंतर २००० मध्ये सैफ अली खान आणि प्रीती झिंटा यांच्या ‘क्या कहना’ चित्रपटात ती झळकली होती. इतकंच नाही तर, शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातही तिने काम केलं होतं. मात्र, २०२३ पासून ती अभिनय विश्वापासून दूर आहे.

रीना कपूर यांनी केलं होतं अरेंज मॅरेज

पडद्यावर अत्यंत साध्या भूमिका करणारी रीना खऱ्या आयुष्यातही तशीच आहे. तिने आपल्या आई-वडिलांच्या सांगण्यावरून अरेंज मॅरेज केलं. रीनाचे पती करण निझेल हे पायलट आहेत. एका मुलाखतीदरम्यान रीनाने लग्नाबाबत वाटणाऱ्या भीतीबद्दल सांगितलं होतं. घटस्फोट आणि भांडणाची खूप भीती वाटत असल्याने, लग्न करायचंच नाही असं त्यांना वाटत होतं. मात्र, करणच्या रूपाने त्यांना एक उत्तम जोडीदार मिळाला. हे दोघेही अध्यात्मिक असून साधे जीवन जगतात.

आई होऊ शकली नाही रीना कपूर

रीना आणि करण यांच्या लग्नाला २१ वर्षे झाली आहेत, तरीही त्यांना अद्याप मूल झालेलं नाही. एकदा आई न होऊ शकल्याबद्दल तिने तिचं दुःख व्यक्त केलं होतं. “कदाचित माझ्या नशिबात ते सुख नसावं,” असं रीना म्हणाली होती. ती दोन वेळा गरोदर राहिली होत्या, पण दुर्दैवाने दोन्ही वेळा तिचा गर्भपात झाला. या घटनांमुळे ती इतकी घाबरली की पुन्हा बाळासाठी प्रयत्न केले नाही. आपल्या नशिबात आई होणं लिहिलेलं नसावं, असं समजून त्यांनी परिस्थिती स्वीकारली.