Madhuri Dixit-Yami Gautam : अभिनेत्री यामी गौतम आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांची जोडी लवकरच ‘कोण होणार करोडपती’च्या आगामी भागात सहभागी होणार आहे. ‘नव्या नवेली’ या सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने या दोघांनीही ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर खास उपस्थिती लावली आहे. या शोमध्ये यामीने माधुरीला तिच्या प्रेग्नन्सीदरम्यानचा एक खास किस्सा सांगितला.
यामी गौतम शोमध्ये एन्ट्री घेताच खूप छान मराठी बोलली. इतकंच नव्हे तर यामीने तिला पुरणपोळी आणि उकडीचे मोदक हे दोन मराठी पदार्थ खूप जास्त आवडतात असंही सांगितलं.
यामी सांगते, “आर्टिकल ३७०’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमादरम्यान मी मीडिया आणि सगळ्या चाहत्यांसमोर मी गरोदर असल्याचं सांगितलं होतं. तो ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम संपला, पत्रकार परिषदही झाली आणि मी लगेच घरी माझ्याकडे ज्या मदतनीस आहेत त्यांना फोन केला. त्यांना म्हटलं, “ताई पटकन पुरणपोळी बनवा…मला खूप पुरणपोळ्या खाव्याशा वाटत आहेत आणि मला हा दिवस सेलिब्रेट करायचा आहे. पुरणपोळी आणि उकडीचे मोदक हे दोन्ही मराठमोळे पदार्थ मला खूप आवडतात.”
माधुरी यावर म्हणाली, “आपण दोघीजणी सेम आहोत…मलाही उकडीचे मोदक फार आवडतात. पण, मी गरोदर असताना मला कधीच असे डोहाळे लागले नाहीत. मला हेच पदार्थ खाऊयात वगैरे असं कधीच वाटलं नव्हतं. पण, जेव्हा माझा धाकटा मुलगा होणार होता तेव्हा मला सगळं चमचमीत खाऊया असं वाटायचं. आता माझा धाकटा मुलगाच आमच्या घरात सगळ्यात जास्त तिखट खातो. आता बघ तुझ्या मुलाला सुद्धा सर्वात जास्त गोड पदार्थ आवडत असतील.”
तर यावर यामी म्हणाली, “हो…त्याला गोड पदार्थ खूप आवडतात.”
माधुरी आणि यामी गौतमच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी सुद्धा कौतुकाचा वर्षाव केला आहे. “दोघीही उत्तम अभिनेत्री आहेत”, “पुरणपोळी आणि मोदक प्रत्येकाचा वीक पॉइंट आहे” अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून आल्या आहेत. दरम्यान, हा विशेष भाग १७ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो रात्री ९ वाजता सोनी मराठीवर प्रसारित केला जातो.
