अभिनेता विशाल निकमची मुख्य भूमिका असलेली ‘येड लागलं प्रमाचं’ ही मालिका गेल्या वर्षभरापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मंजिरी व राया यांच्या जोडीने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे; तर सध्या या मालिकेत महत्त्वाचं वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या प्रोमोला वाहिनीकडून “जगजाहीर होणार मंजिरीच्या आयुष्यातील कटू सत्य…” असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये राया विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात जाऊन “मिस फायरला ही साडी आणि चुडा देऊन लग्नाची मागणी घालणार” असं म्हणतो. याकरिता तो मंजिरीच्या घरी गेला असताना तिथे मंजिराला शशिकला घराबाहेर काढताना दिसते. राया तिथे येताच त्याच्यासमोर मंजिरीला धक्का मारून घराबाहेर काढत असल्याचं त्याला दिसतं. यावेळी शशिकला मंजिरीच्या आईला “ओ जाऊबाई, किती दिवस लेक लेक करून जगाला फसवणार? का नाही सांगत तुम्ही, ही तुमची मुलगी नाही तर सून आहे,” असं म्हणते. यापुढे जय, “अशी सून, जी विधवा असून कुमारिकेचं नाटक करतेय” असं म्हणतो आणि रायाला, “बोल अजूनही मंजिरीशी लग्न करशील का” असं विचारतो. समोर घडत असलेलं चित्र पाहून रायाला धक्का बसतो आणि मंजिरीवर फेकण्यात आलेल्या पांढऱ्या सफेद कपड्यावर त्याच्याकडून कुंकू सांडतं. पण, यावेळी राया स्तब्ध झालेला असतो आणि घडलेल्या प्रसंगावर काहीही बोलत नाही.
सोमवारी २ जूनला मंजिरीचं खरं सत्य समोर येणार आहे. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत सोमवारी मोठा ट्विस्ट येणार आहे. मंजिरीचं सत्य नेमकं काय असेल, ती जिजी आणि नानांची मुलगी नाही तर सून आहे हे. नातं नेमकं काय आहे? याचा उलगडा सोमवारच्या भागात होणार आहे. मंजिरीचं सत्य समजल्यानंतर रायाचं तिच्यावरचं प्रेम कमी होइल का? राया मंजिरीशी सगळं सत्य माहीत असतानाही लग्न करेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोमवार २ जून ते बुधवार ४ जूनच्या भागांमध्ये पाहायला मिळणार असल्याचं वाहिनीने सांगितलं आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनी गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहे. वाहिनीवरील सर्व कलाकार मंडळी मंजिरीचं सत्य समजणार २ जूनला असं सांगताना दिसत आहेत. कलाकारांचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झालेली दिसते. सोमवार ते बुधवारच्या भागात मंजिरीचं सत्य समोर आल्यानंतर मालिका पुढे काय वळण घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.