Star Pravah Serial Actress Exit : छोट्या पडद्यावरील काही लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे, ‘येड लागलं प्रेमाचं’ ही मालिका. अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता विशाल निकम या जोडीने या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या मालिकेतून नुकतीच ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांची एक्झिट झाली. त्याबद्दलची पोस्ट त्यांनी शेअर केली होती.

अशातच आता या मालिकेतून आणखी एका अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे. त्याबद्दल स्वत: अभिनेत्रीनेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता नवनाळे. ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत प्राजक्ता मंजिरीची बहीण ऋजुता या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. मात्र, आता तिचा या मालिकेतला प्रवास संपला आहे.

‘येड लागलं प्रेमाचं’मधून प्राजक्ता नवनाळेची एक्झिट

मालिकेतून निरोप घेताच प्राजक्ताने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणते, “माझ्यासाठी हा सगळ्यात अवघड आणि खूप भावूक असा हा क्षण आहे. एन्ट्रीचा पहिला सीन ते आजचा शेवटचा सीन… हा सगळा प्रवास आठवला आणि राहवलं नाही. ऋजुताचा शेवटचा सीन करताना खूप भरून आलं. ऋजुताचा प्रवास खूप भारी होता. गेली दोन वर्षं ऋजुतावर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. प्रत्येक सीनची, ऋजुताच्या लूकची पोचपावती कायम मिळाली. दोन वर्षांत खूप काही शिकायला मिळालं. आज ऋजुताचा गोड प्रवास इथेच थांबतोय. काय चुकलं असेल, तर मोठ्या मनाने माफ करा. दोन वर्षांचा हा प्रवास माझ्यासाठी खूप मोठा आहे. एखादं पात्र साकारताना त्याची इतकी सवय होऊन जाते की, रोजच्या वागण्यात-बोलण्यातसुद्धा ते पात्र कळत नकळत येत असतं. रोजचं ठरलेलं रूटीन असतं आणि अचानक आता हे सगळं नसणार. तो सेट, ती मेकअप रूम, स्पॉटदादांनी बनवलेली ब्लॅक कॉफी… आल्या आल्या मिळालेली ती स्क्रिप्ट… मॅडम, सीनसाठी बोलावलाय हा आवाज, ऋजुताचा क्लोज लागलाय टचअप करा रे हे आता नसणार. पण, माझ्या मनात या गोड आठवणी मी कायम जपून ठेवणार आहे.”

पुढे ती म्हणते, “थोडा खेळकर स्वभाव असल्यामुळे सेटवर माझ्याच हसण्याचा आवाज असायचा. हसण्याच्या आवाजावरून कळायचं ऋजुता आली. या माझ्या गोड प्रवासात मला सगळे सहकलाकारही छान मिळाले. समजून घेऊन शांततेत मजा करत आम्ही सीन करायचो. आजवर ज्या मालिका केल्या, त्यातला हा बेस्ट सेट होता. माझा टीमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. गोड माणसांमुळे हा प्रवास आणखीनच गोड झाला. माझ्या ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेच्या टीमला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद! माझ्यावर विश्वास दाखवून मला हे पात्र साकारायची संधी दिली. DOP दादांचे ‘या पाहू’ हे शब्द आठवणीत राहतील. ऋजुता निरोप घेतेय; पण पुढचा प्रवास याहून भन्नाट असणार आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम पाठीशी राहील यात शंकाच नाही. लवकरच काहीतरी नवीन घेऊन भेटू…” शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्राजक्ताला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे.

निरोप घेताना अभिनेत्री प्राजक्ता नवनाळेला अश्रु अनावर

दरम्यान, प्राजक्ताने शेअर केलेल्या पोस्टखाली अनेक चाहत्यांनीसुद्धा नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “तुझी आठवण येईल”, “तुझ्यामुळे हे ऋजुता पात्र रंगलं”, “तुझी भूमिका संपली असली तरी तू प्रेक्षकांच्या मनात कायमच राहशील”, तुझ्या नवीन प्रोजेक्टची वाट बघत आहोत”, या आणि अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.