कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे मल्हार आणि अंतरा. अर्थात अभिनेता सौरभ चौघुले आणि अभिनेत्री योगिता चव्हाण. मालिकेत काम करत असतानाच या दोघांचे खऱ्या आयुष्यातही सुर जुळले आणि मग त्यांनी एकमेकांबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. गेल्यावर्षी म्हणजेच ३ मार्च २०२४ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.
सौरभ-योगिता यांनी सोशल मीडियावर थेट लग्नाचे फोटो शेअर करत दोघांनी त्यांच्या लग्नाबद्दलची बातमी दिली होती. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसह अनेकांनाच सुखद धक्का बसला होता. सौरभ-योगिता यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. अशातच आता लग्नाच्या वर्षपुर्तीनंतर योगिताने स्वत:च्या युट्यूब चॅनलवर लग्नाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये योगिता व सौरभ यांच्या लग्नाची खास झलक पाहायला मिळत आहे. पाहुण्यांनी भरलेलं मंडप, योगिताची लगीनघाई, मित्रांचा कल्ला, मजामस्ती आणि डान्स असं सगळंच या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. योगिता-सौरभ दोघांनीही लग्नात अगदी नाचत नाचत एन्ट्री घेतली होती आणि याचे खास क्षणही या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. दरम्यान या व्हिडीओमधील एका खास क्षणाने सर्वांचं लक्ष वेधलं आहे, तो क्षण म्हणजे उखाण्यांचा.
‘जीव माझा गुंतला’ या मालिकेमुळे योगिता-सौरभ यांचे सुर जुळले. त्यामुळे लग्नाच्या उखान्यात त्यांनी मालिकेचं नाव घेत हटके उखाणे घेतले. यावेळी योगिताने नवरा सौरभसाठी असा उखाणा घेतला की, “अखेर जीवनसाथीच्या शोधाचा प्रवास संपला, सौरभचं नाव घेते जीव माझा गुंतला.” यानंतर सौरभ योगितासाठी उखाणा घेतो की, “आयुष्यभर हिला सांभाळण्याचा वसा मी घेतला, योगिताचं नाव घेतो हिच्यात जीव गुंतला.”
योगिता-सौरभ यांच्या लग्नाला मराठी टेलीव्हिजन विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तसंच ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतील कलाकारही या लग्नाला पोहोचले होते. अभिनेत्री हर्षदा खानविलकरदेखील योगिता-सौरभ यांच्या लग्नात उपस्थित होत्या. दरम्यान, योगिता-सौरभ सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. दोघे त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. तसंच कामाबद्दलची माहितीही शेअर करत असतात.