Dhanashree Verma Dance Video : सोशल मीडियावर सध्या संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्राम रील्सपासून ते युट्यूबच्या शॉर्ट व्हिडीओपर्यंत सर्वत्र हे गाणं तुफान व्हायरल झालं आहे. नेटकऱ्यांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्याची भुरळ पडली आहे.

बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्री, मराठी टेलिव्हिजनची लाडकी नायिका रेश्मा शिंदे किंवा ‘बिग बॉस’ फेम आयशा खान असो… या सगळ्या अभिनेत्रींनी ‘शेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स करून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री व नृत्यांगना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनश्री वर्माला सुद्धा आता ‘शेकी’ गाण्याची भुरळ पडली आहे. धनश्रीने नुकताच “एक कंबर, तुझी कंबर” म्हणत संजू राठोडच्या ट्रेंडिंग गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.

धनश्रीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अभिनेत्री व नृत्यांगना म्हणून ओळखली जाणारी धनश्री ही भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल याची पूर्वाश्रमीची पत्नी आहे. २२ डिसेंबर २०२० रोजी युजवेंद्र आणि धनश्री लग्नबंधनात अडकले होते. मात्र, २०२३ मध्ये धनश्री व चहलच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. अखेर मार्च २०२५ मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर धनश्री सध्या तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.

‘शेकी’ गाण्यावर डान्स करताना धनश्री वर्माला लोकप्रिय अभिनेता शहजान खानने साथ दिल्याचं पाहायला मिळत आहे. शहजान उत्तम डान्सर आहे. धनश्री आणि शहजानच्या या डान्स व्हिडीओवर संजू राठोडने “Woah…” अशी कमेंट करत दोघांचं कौतुक केलं आहे.

धनश्री या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “संजू हे गाणं मला खूप आवडलं…पुढचं गाणं एकत्र शूट करुया?” नेटकऱ्यांनी देखील धनश्रीच्या या हटके डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘शेकी’ या गाण्याबद्दल सांगायचं झालं, तर या गाण्याचा लेखक आणि गायक स्वत: संजू राठोड असून, याची संगीत निर्मिती G-Spark ने केली आहे. या गाण्यात मुख्य अभिनेत्री म्हणून हिंदी ‘बिग बॉस’ गाजवणारी अभिनेत्री ईशा मालवीय झळकली आहे. या ‘शेकी’ गाण्याला अवघ्या काही दिवसांत चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.