Dinyar Tirandaz Passes Away: सिनेमा, मालिका, नाटक या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते दिनयार तिरंदाज यांचे निधन झाले. ११ जून २०२६ ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. विनोदी तसेच पारशी भूमिकांसाठी ते ओळखले जात होते.

‘Parsi Zoroastrians Worldwide – The Hyderabadi Page’ या फेसबुक ग्रुपवर त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली. यानंतर ही माहिती अनेक इन्स्टाग्राम पेजेसवरही शेअर करण्यात आली. फेसबुक पोस्टनुसार, मुंबईतील वाडिया बंगली येथे दुपारी ३.४५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

दिनयार तिरंदाज यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला. सुरेश मेनन यांनी ‘ॐ शांती’ असे लिहित श्रद्धांजली वाहिली. याबरोबरच, अभिनेते चित्रगंधा सिंह, उदय टिकेकर यांच्यासह अनेक कलाकारांनी, चाहत्यांनी दु:ख व्यक्त केले.

दिनयार तिरंदाज यांच्या भूमिका असलेल्या मालिका

दिनयार तिरंदाज प्रमुख भूमिकांमध्ये फासरे दिसले नाहीत,पण तरीही त्यांच्या अभिनयातून, विनोदी अंदाजातून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दुनिया’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी टेलिव्हिजन आणि चित्रपट अशा दोन्ही माध्यमांमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नुक्कड, ब्योमकेश बक्षी यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले.

‘जबान संभाल के’ या विनोदी मालिकेतील त्यांची मिस्टर केकी दारूवाला ही भूमिका चांगलीच गाजली होती. त्यांना या भूमिकेमुळे मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त लक्षात राहिलेल्या पारशी पात्रांपैकी ही एक भूमिका मानली जाते. या मालिकेत अनेक लोकप्रिय कलाकार होते. सुमीत राघवन, पंकज कपूर, शोमा आनंद, शुभा खोटे, विजू खोटे, तनाज ईरानी, टॉम ऑल्टर हे कलाकाही या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

‘या’ सिनेमांत दिनयार तिरंदाज यांनी केलेले काम

मालिकांबरोबरच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले. हॅलो ब्रदर, अलबेला, चलते चलते, मैं प्यार क्यूँ किया, क्या कहना, दिल है कि मानता नहीं तसेच कमाल धमाल मालामाल अशा सिनेमांत त्यांनी काम केले आहे.

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेला Wassup Zindagi हा गुजराती चित्रपट त्यांच्या कारकिर्दितील शेवटचा सिनेमा ठरला.