‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात यंदा ‘सहाय्यक खलनायिका’ हा पुरस्कार नव्याने सुरू करण्यात आला. हा अवॉर्ड पहिल्याच वर्षी कोण जिंकणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. अखेर ‘कमळी’ मालिकेतल्या अनिकाने यात बाजी मारली. अनिका ही भूमिका लोकप्रिय अभिनेत्री केतकी कुलकर्णी साकारत आहे. ती खऱ्या आयुष्यात अवघ्या २१ वर्षांची आहे. यापूर्वी सुद्धा ती झी मराठीच्या ‘अस्मिता’ या लोकप्रिय मालिकेत झळकली होती. याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात…

केतकीने ११ वर्षांपूर्वी ‘झी मराठी’च्या अस्मिता या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. ‘अस्मिता’ ही मालिका महिला गुप्तहेरावर आधारित होती. आता केतकी २१ वर्षांची असून ‘कमळी’मध्ये ती खलनायिकेची भूमिका साकारतेय.

ketaki kulkarni kamali
अभिनेत्री केतकी कुलकर्णी

हा पुरस्कार जिंकल्यावर ती म्हणाली, “गणपती बाप्पा मोरया! मी सहसा इतकं मोठं कॅप्शन लिहित नाही. पण, हा क्षण खरोखरच खूप खास आहे. कारण, माझ्यासाठी हा पुरस्कार जिंकणं ही खूप मोठी गोष्ट आहे. यानिमित्ताने माझं एक स्वप्न पूर्ण झालं. बालपणी हा पुरस्कार सोहळा मी घरी टीव्हीवर पाहायचे. या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन, विजेती होण्यापर्यंतचा प्रवास खूप मोठा होता. हा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आज मनात फक्त कृतज्ञता आहे. या भावना खरंतर मी शब्दांत मांडू शकत नाही. मला व्होट देऊन विजयी केल्याबद्दल तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. तुम्ही माझ्यावर जे प्रेम केलं…अनिकाला तुमच्या आवडीचं पात्र बनवलं. यासाठी खूप-खूप धन्यवाद. आई, बाबा, दादा, आजी आणि आबा…तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं आणि मला माहितीये तुम्ही सगळे सुद्धा खूप आनंदी असाल. आबा…मला खात्री आहे तुम्ही जिथे कुठे असाल, तिथून माझ्याकडे बघून नक्कीच हसत असाल. झी मराठीची संपूर्ण टीम, कमळी मालिकेची टीम, माझे सहकलाकार सर्वांचे मनापासून आभार. हा पुरस्कार फक्त माझ्या एकटीचा नाही, तर आपल्या सर्वांचा आहे. बाप्पा, मी सदैव तुझी ऋणी राहीन.”

दरम्यान, केतकी प्रमुख भूमिका साकारत असलेली ‘कमळी’ मालिका झी मराठीवर रात्री ९ वाजता प्रसारित केली जाते.