Savalyachi Janu Savali : छोट्या पडद्यावर सध्या टीआरपीसाठी मोठी स्पर्धा निर्माण झालीये. याच पार्श्वभूमीवर झी मराठी वाहिनीवर मालिकांसाठी दुपारचं विशेष सत्र सुरू करण्यात आलं आहे. यामध्ये ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या दोन लोकप्रिय मालिका प्रसारित केल्या जातात. या दोन्ही मालिका झी मराठीचं दुपारचं सत्र गाजवत आहेत आणि स्लॉट लीडर सुद्धा ठरत आहेत. यापैकी ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत लीप आल्याचं पाहायला मिळालं होतं.
सावलीला सासुने घराबाहेरचा रस्ता दाखवल्यावर ती मेहेंदळे कुटुंबीयांपासून दूर जात आपलं वेगळं आयुष्य सुरू करते. तिला दोन जुळी मुलं होतात. अबीर सावलीकडे लहानचा मोठा होत असतो. तर, सारंग ओवीचं संगोपन करतोय. लीप आल्यावर या मालिकेतून एक खास अभिनेत्री गायब झाली होती. मात्र, आता तिने त्याच डॅशिंग अंदाजात पुन्हा एकदा या मालिकेत एन्ट्री घेतली आहे.
सावलीच्या आयुष्यात भैरवी वझे पुन्हा एकदा येतेय. भैरवी सावलीला तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी शत्रू मानत असते. सुरुवातीला भैरवी अगदी पारंपरिक लूकमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळायची. पण, आता तिचा एक वेगळाच अंदाज सर्वांना पाहायला मिळेल. हाय हिल्स, फॉर्मल ब्लेझर सूट, स्टायलिश लूक अशा मॉडर्न लूकमध्ये भैरवी सर्वांसमोर येणार आहे. सावलीचं आयुष्य उद्धवस्थ करायचं हा तिचा एकमेव हेतू आहे.
भैरवी या खलनायिकेची भूमिका अभिनेत्री मेघा धाडे साकारत आहे. आता पडद्यावर मेघा जरी कपटी खलनायिकेची भूमिका साकारत असली तरी प्रत्यक्षात सेटवर मात्र ती सर्वांची विशेषत: सावलीची खूपच फेव्हरेट आहे.
त्यामुळे मेघा सेटवर परतणार म्हणून या सगळ्या कलाकारांनी तिच्या मेकअप रूममध्ये खास सजावट केली होती. सावलीची भूमिका साकारणारी प्राप्ती म्हणते, “खूप महिन्यानंतर आमच्या सगळ्यांची फेव्हरेट मेघा ताई पुन्हा एकदा सेटवर येणारे…त्यामुळे आम्ही रूम सजवलीये.”
सहकलाकारांनी आपलं इतकं छान स्वागत केलं हे पाहून मेघा भारावून गेली होती. या व्हिडीओवर कमेंट करत ती म्हणते, “हे प्रेम शब्दांत व्यक्त करणं शक्य नाही. हे इतकं प्रेम मी कुठे साठवून ठेवू? तुमच्यामुळे मी रोज आनंदाने सेटवर येते. लव्ह यू सो मच…मी संपूर्ण टीमचे खूप-खूप आभार मानते.”
दरम्यान, ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका झी मराठीवर दुपारी १ वाजता प्रसारित केली जात आहे. प्राप्ती रेडकर, साईंकित कामत, साईराज केंद्रे, वेदांती भोसले, सुलेखा तळवलकर या कलाकारांच्या या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
