Zee Marathi Home Minister Promo Aadesh Bandekar : ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाने महाराष्ट्राच्या घराघरांत एक वेगळी ओळख निर्माण केली. १३ सप्टेंबर २००४ मध्ये ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. “दार उघड बये…दार उघड” अशी धून वाजली की, घराघरांत ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम लागला हे समजून जायचं. या कार्यक्रमाने तब्बल २० वर्षांनी म्हणजेच १३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या कार्यक्रमाला २० वर्षांत प्रेक्षकांचं भरपूर प्रेम आणि घवघवीत यश मिळालं. आता हा सदाबहार कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचं नवीन पर्व लवकरच सुरू होईल. याची अधिकृत घोषणा झी मराठीकडून करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लाडके आदेश बांदेकर भावोजी पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
आदेश बांदेकरांच्या कमबॅकचा प्रोमो नुकताच वाहिनीकडून अधिकृतरित्या शेअर करण्यात आला आहे. मात्र, सध्या या कार्यक्रमाची लॉन्च डेट अन् वेळ गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. लवकरच याचीही घोषणा केली जाईल.
आदेश बांदेकरांचं झी मराठीवर कमबॅक झाल्यावर प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये एकच जल्लोष केला आहे. ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम घरघरांत मोठ्या आपुलकीने पाहिला जायचा. त्यामुळे या प्रोमोवर सर्वांनीच कौतुकाचा वर्षाव केला आहे. आदेश बांदेकरांच्या सुनबाई पूजा बिरारीने या प्रोमोच्या कमेंट्समध्ये ‘हार्ट इमोजी’ आणि ‘फायर इमोजी’ देत सासरेबुवांना शुभेच्छा दिल्या आहेत.
तर, आदेश बांदेकरांचा लेक सोहम हा प्रोमो स्टोरीवर शेअर करत लिहितो, “श्री स्वामी समर्थ…बाबांना ऑनस्क्रीन बघून खरंच खूप छान वाटलं…फादर्स डेचं मलाच गिफ्ट मिळालंय.”
आता ‘होम मिनिस्टर’ हा बहुचर्चित कार्यक्रम केव्हा लॉन्च होणार, यंदा शोची थीम काय असेल, भावोजी वहिनींना कोणत्या पैठणी गिफ्ट करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. “ठरलं तर मग भावोजी आता परत येणार”, “वनसाइड कमबॅक”, “फायनली झी मराठी जुनं ते सोनं”, “एक नंबर भावोजी इज बॅक”, “भावोजी सुरुवात तुमच्या घरातून झाली पाहिजे…नव्या सुनबाई आलेल्या आहेत”, “अभिनंदन खूप उत्सुकता आहे” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर आल्या आहेत.
