Zee Marathi SaReGaMaPa Promo Avadhoot Gupte Show : ‘झी मराठी’ वाहिनीने नुकतीच ‘होम मिनिस्टर’ या त्यांच्या एव्हरग्रीन शोची घोषणा केली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर वाहिनीवर पुनरागमन करणार आहेत. “बांदेकर पैठणी घेऊन आले…” हा आवाज आता पुन्हा एकदा घराघरांत ऐकू येणार आहे. आदेश बांदेकरांच्या कमबॅकची चर्चा सुरू असतानाच आता ‘झी मराठी’ने प्रेक्षकांबरोबर आणखी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच ‘सा रे ग म प’ हा गाण्यांचा शो पुन्हा एकदा सुरू होणार आहे. २००६ मध्ये या सिंगिंग शोची सुरुवात झाली होती. यानंतर ‘सारेगमप’चे जवळपास ११ सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सगळ्याच सीझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता पुन्हा एकदा हा सदाबहार कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे.

विशेष म्हणजे, ‘सारेगमप’च्या गेल्या काही पर्वापासून प्रेक्षक अवधूत गुप्तेला खूप जास्त मिस करत होते, आणि आता आदेश बांदेकरांपाठोपाठ अवधूत गुप्तेचंही ‘झी मराठी’वर कमबॅक झालेलं आहे. नुकताच याचा खास प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

आता महाराष्ट्रातील घराघरांत पुन्हा एकदा “तोडलंस राणी…तोडलंस”, “वरचा ‘सा’ परफॉर्मन्स” असे अवधूत गुप्तेचे हटके डायलॉग ऐकायला मिळतील. “महाराष्ट्राच्या घराघरात पुन्हा रंगणार सुरांची मैफल, कारण गाणं ऐकलं की बरं वाटतं..” असं कॅप्शन ‘झी मराठी’ने या प्रोमोला दिलं आहे.

‘सा रे ग म प’च्या नव्या सीझनची लॉन्च डेट अद्याप रिव्हिल करण्यात आलेली नाहीये. लवकरच होम मिनिस्टर आणि ‘सा रे ग म प’ या दोन्ही कार्यक्रमांच्या लॉन्चिंगचा मुहूर्त जाहीर केला जाईल.

दरम्यान, नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “खूप मस्त”, “होम मिनिस्टर आणि आता ‘सा रे ग म प’चा प्रोमो मस्त…OG झी मराठी इज बॅक”, “सदाबहार शो…खूप छान निर्णय”, “प्लीज यावेळी ऑडिशन घ्या”, “मस्त कार्यक्रम”, “वेलकम बॅक गुप्ते” अशा असंख्य कमेंट्स या प्रोमोवर आल्या आहेत.