‘झी मराठी’ वाहिनीवर साधारण अडीच वर्षे ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका सुरू होती. मार्च २०२५ मध्ये या लोकप्रिय मालिकेने सर्वांचा निरोप घेतला. मात्र, यामधील कलाकार प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. ‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये शिवानी नाईक आणि अभिनेता रोहित परशुराम यांची जोडी प्रमुख भूमिकेत झळकली होती.
शिवानी आणि रोहित ‘अप्पी आमची कलेक्टर’नंतर नव्या कोणत्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर रोहितच्या कमबॅकची तारीख ठरली आहे. लोकप्रिय अभिनेता रोहित परशुराम ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचं नाव आहे आनंदी.
‘आनंदी’…ही कथा आहे आनंदीची. एका अपघातात दृष्टी गमावलेल्या, पण तरीही जीवनाकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनाने पाहणाऱ्या तरुणीची. ही मालिका स्टार प्रवाहवर १६ मार्च २०२६ पासून सुरू होणार आहे. आता ही नवीन मालिका नेमकी कोणत्या वेळेत प्रसारित केली जाणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.
‘आनंदी’ मालिकेत रोहित परशुरामच्या साथीला मुख्य अभिनेत्रीची भूमिका जाई खांडेकर साकारणार आहे. जाईने यापूर्वी भूमिका या नाटकात प्रमुख भूमिका साकारली आहे. आता ही दमदार अभिनेत्री मालिकाविश्वातून प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.
रोहित परशुराम व जाई खांडेकर यांच्यासह या नव्या मालिकेत अभिनेत्री आलापिनी निसळ सुद्धा झळकणार आहे. तिने यापूर्वी ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत काम केलं होतं.

‘आनंदी’ या नव्या मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. रेश्मा शिंदे, अभिषेक रहाळकर, अमित भानुशाली, ऋतुजा बागवे या कलाकारांनी कमेंट्स करत या आनंदी मालिकेच्या टीमला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, ‘आनंदी’बद्दल सांगायचं झालं तर, तिचं अंधत्व हा तिचा दुबळेपणा नसून तिची सगळ्यात मोठी ताकद आहे. इतरांना सहज न सापडणाऱ्या गोष्टी आनंदी सहज ओळखते. ती अत्यंत संवेदनशील असून गरजूंना मदत करणं हा तिच्या स्वभावाचा अविभाज्य भाग आहे. कधी कधी आपले डोळे आपल्याला फसवू शकतात, पण मन कधीच नाही हा आनंदीचा जीवनमंत्र आहे. जगण्याचा भरभरून आनंद घेणारी आनंदी म्हणूनच इतरांपेक्षा वेगळी ठरते.
