झी मराठीचा पुरस्कार सोहळा लवकरच पार पडणार आहे. काही दिवसांपासून प्रेक्षकांनी त्यांच्या आवडत्या कलाकारांना मतदान करावे यासाठी आवाहन केले जात होते. आता पुरस्कार सोहळ्याआधी नामांकर सोहळा पार पडणार आहे. त्याची झलक समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, मृण्मयी देशपांडे या सोहळ्याचे सूत्रसंचालन करीत आहे. ती म्हणते, “सेलिब्रेशन करूया, घेऊन एक क्लिक, सुरू झालीये मनोरंजनाची ग्लॅम पिकनिक.”
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, सहलीला जायाचं, जायाचं सहलीला या गाण्यावर कलाकार डान्स करीत आहेत. त्यामध्ये केदार-तारिणी, जय-शर्वरी अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे. याबरोबरच, कृष्णाईच्या लेकी, दीप ज्योती, तारिणी, कमळी, लक्ष्मी निवास, सावळ्याची जणू सावली, देवमाणूस, धाकट्या सूनबाई, सनई चौघडे ते वीण दोघांतली ही तुटेना अशा सर्व मालिकांतील कलाकारांचा लूक पाहायला मिळत आहे. त्यांच्या सुंदर लूकबरोबरच त्यांनी केलेली मजा-मस्ती, त्यांना दिलेले वेगवेगळे मजेशीर टास्क अशा सगळ्या गोष्टी लक्ष वेधून घेत आहेत.
या सगळ्यात मालिकांमध्ये आजी, आई अशा भूमिका साकारलेल्या अभिनेत्री त्यांच्या वेगळ्या अंदाजाने लक्ष वेधून घेत आहेत. मृण्मयी त्यांना जेन झी पिढी म्हणत असल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
प्रोमोमध्ये पुढे कलाकारांना नामांकन दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट नायक, नायिका आणि इतर नामांकनांचा समावेश आहे. शेवटी कलाकार जल्लोष करतानाही दिसत आहेत.
दरम्यान, हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘झी मराठीच्या कलाकारांसह रंगणार ‘मनोरंजनाची ग्लॅम पिकनिक’, अशी कॅप्शन दिली आहे. हा सोहळा २५ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळणार आहे.
