Zee Marathi Awards 2026 audience reaction: झी मराठी वाहिनीचा २०२६ मधील पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात कलाकारांची एक वेगळी बाजू पाहायला मिळाली. त्यांना एका वेगळ्या रूपामध्ये पाहायला मिळाले. तसेच, त्यांची भावनिक बाजूही दिसली. कलाकारांनी सोहळ्यात प्रेक्षकांना खळखळून हसवले. अनेक कलाकारांना पुरस्कार मिळाले, तर काहींना मात्र मिळाले नाहीत.

आता झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना विचारले की, झी मराठी अवॉर्ड्स २०२६चा सोहळा कसा वाटला? यावर प्रेक्षकांनी अनेक कमेंट्स करत त्यांचे मत मांडले आहे.

‘झी मराठी पुरस्कार सोहळा २०२६’वर प्रेक्षकांची नाराजी

एकाने लिहिले, “अजिबात आवडला नाही. प्रेक्षकांच्या आवडीने पुरस्कार दिलेलेच नाहीत. कोणत्या अँगलने, कोणत्या हेतूने दिले गेले ते आपणच जाणे. जगभरात लोकप्रिय असलेली ‘तारिणी’ मालिका डावलली गेली. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेला अगदी डोक्यावर घेतले गेले. मग या पुरस्कार सोहळ्याचा घाट घातलाच कशाला? तुमच्याच आवडीच्या मालिकेला पुरस्कार देऊन टाकायचे ना! यात प्रेक्षकांच्या मतांना हेतूपुरस्सर डावलले गेले आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले, “पुरस्कार पक्षपाती होते. युवराजने खलनायक म्हणून काय छान अभिनय केला आहे. त्याला पुरस्कार मिळायला हवा होता. याबरोबरच, सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार ‘तारिणी’ला मिळायला हवा होता.”

एका नेटकऱ्याने लिहिले, “सगळे पुरस्कार पक्षपाती होते.” आणखी एकाने लिहिले, “तुम्ही केदारला एकही मुख्य पुरस्कार दिला नाही. त्याची पहिली मालिका असूनही तो किती छान काम करतो. केदार हे पात्र किती भारी आहे. तुम्हाला टॅलेंटची किंमती नाही. किती पक्षपातीपणा? तो नवीन आहे म्हणून? तो सर्वोत्कृष्ट नायक, मुलगा आणि नवरा या पुरस्कारांसाठी पात्र आहे. कमीत कमी फ्रेश फेस हा पुरस्कार तरी द्यायला हवा होता. ‘तारिणी’ मालिकेला खूप बाजूला केले आहे. केदारला फक्त तुम्ही बेस्ट जावई पुरस्कार दिला. खूप निराशा वाटली.”

आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्ही सरसकट एकाच मालिकेला सगळे पुरस्कार दिले. मागच्या वेळी ‘लक्ष्मी निवास’ला दिला. यावेळी ‘सनई चौघडे’ला दिला, हे चुकीचे आहे.” एकाने लिहिले, “पुरस्कार सोहळा आवडला नाही, कारण अर्ध्यापेक्षा जास्त पुरस्कार हे पक्षपाती होते. ‘सनई चौघडे’ आणि ‘वीण दोघांतली ही तुटेना’ला जास्त पुरस्कार मिळाले. खरंतर सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार ‘तारिणी’ला मिळायला हवा होता. “

एकाने लिहिले, “आजिबात आवडले नाही, तुम्हाला जर व्यवस्थित निवड करता येत नाही तर अवॉर्ड देत जाऊ नका. सगळ्यात बेस्ट मालिका ‘तारिणी’ आहे, पण तुम्ही तर सगळे अवॉर्ड ‘सनई चौघडे’ला देऊन ठेवले.” आणखी एकाने शोमधील जाहिरातीवरून टीका केली. नेटकऱ्याने लिहिले, “”सर्वोत्कृष्ट सासू”, “लोकप्रिय नायिका”, “लोकप्रिय नायक”, “लोकप्रिय कुटुंब”, “लोकप्रिय मालिका”, असे कित्येक कॅटेगरी वजा करून नुसते जाहिराती केल्या; जमलंय जमलंय अनुरूप हे प्रोफेसर ते प्रोफेसर झी मराठी अवॉर्ड्स २०२६ कमी आणि उद्योजक एंटरप्रायनरशिप जाहिरात प्रमोशन जास्त वाटले. ‘तारिणी’ एक उत्कृष्ट मालिका असून त्या मालिकेला मोजून चार पुरस्कार देण्यात आले हे मनाला अजिबात पटले नाही. केदारला पहिला पुरस्कार जावई घेताना अक्षरश: मन हलके झाले, म्हणजे खूप वाईट वाटले. नवीन कलाकार असून इतकी मेहनत करून प्रेक्षकांचे मन जिंकतो, पण त्याचे वाहिनी कौतुक करत नाही निंदनीय गोष्ट आहे; एकाच मालिकेला भरमसाठ पुरस्कार देऊन खूप चूक केली. अवॉर्ड्स कमी करून फक्त आणि फक्त जाहिराती दाखवल्या. असं वाटत होतं की जाहिरातीमध्ये थोडा पुरस्कार सोहळा पाहत होतो.”

एकाने लिहिले, “दीप ज्योतीला एक तरी पुरस्कार मिळायला हवा होता”, आणखी एकाने लिहिले, “सोहळा सुंदर होता. पण, तुला जपणार आहे, देवमाणूस, दीप ज्योतीला एकही पुरस्कार मिळाला नाही. देवमाणूस आणि तुला जपणार आहेचे हे दुसरे वर्ष आहे. पण, दीप ज्योतीचे हे पहिले वर्ष आहे. त्यांना पुरस्कार मिळायला पाहिजे होते. तारिणीला जास्त आणि काही मुख्य पुरस्कार मिळायला पाहिजे होते.”

एकाने लिहिले, “सगळ्या मालिकेमध्ये कोणाला ना कोणाला तरी पुरस्कार मिळालेला आहेच, पण त्या ‘दीपज्योती’ मालिकेमधले कोणालाच पुरस्कार मिळालेला नाही. निर्मात्याची. प्रोडक्शन हाऊसची, लेखकाची, सगळ्या कलाकारांची काय अवस्था असेल? एक पण पुरस्कार नाही मिळाला तर कसं वाटत असेल? प्रयत्न करा, आयुष्यात यश एकदा ना एकदा नक्की मिळतं”, अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी पुरस्कार सोहळा आवडला नसून पुरस्कार देताना पक्षपातीपणा केल्याचे लिहिले आहे.