Zee Marathi Awards 2026 : ‘झी मराठी पुरस्कार सोहळा २०२६’ नुकताच थाटामाटात पार पडला. शनिवारी-रविवारी सलग दोन दिवस या सोहळ्याचं प्रसारण टीव्हीवर करण्यात आलं. सिनेविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार जिंकत बाजी मारलीये ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेने तर, सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार ‘सनई चौघडे’ने जिंकला आहे.
‘सनई चौघडे’, ‘वीण दोघांतली ही तुटेना’, ‘कमळी’, ‘तारिणी’, ‘लक्ष्मी निवास’, ‘कृष्णाईच्या लेकी’ या सगळ्याच मालिकांमधील कलाकारांना यावेळी प्रेक्षकांच्या व्होटिंगनुसार विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. पण, यांच्यासह नॉमिनेटेड असलेल्या ‘दीपज्योती’ मालिकेला या अवॉर्ड शोमध्ये एकही पुरस्कार मिळालेला नाही. तसेच ‘तुला जपणार आहे’, ‘देवमाणूस’ या मालिकांना यंदा नामांकन नव्हतं.
‘दीपज्योती’ मालिकेचं अवॉर्ड सोहळ्याचं हे पहिलं वर्ष होतं. ही मालिका रात्री ८ वाजता प्राइम टाइमला प्रसारित केली जाते. त्यामुळे या मालिकेला निदान एक तरी पुरस्कार मिळायला पाहिजे होता, असं या दीपज्योतीच्या चाहत्यांचं म्हणणं होतं. तशा कमेंट्सही या प्रेक्षकांनी पोस्टवर केल्या आहेत.
“अवॉर्ड सोहळा खूप आवडला पण दीपज्योतीला एक तरी पुरस्कार दिला पाहिजे होता”, “हो खूप सुंदर सोहळा..पण, दीपज्योतीचं हे पहिलं वर्ष होतं त्यांना पुरस्कार दिला पाहिजे होता”, “दीपज्योतीला निदान एक तरी अवॉर्ड द्यायचा”, “दीपज्योतीमध्ये एकालाही पुरस्कारा मिळाला नाही…त्यांनाही वाईट वाटलं असेल” अशा प्रतिक्रिया पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

दरम्यान, झी मराठी पुरस्कार सोहळ्यात सनई चौघडे सर्वोत्कृष्ट मालिका ठरली असून, सर्वोत्कृष्ट नायक-नायिका अनुक्रमे समर ( सुबोध भावे ) आणि शर्वरी ( चिन्मयी साळवी ) हे कलाकार ठरले आहेत.
