‘झी मराठी पुरस्कार सोहळा २०२६’ नुकताच दणक्यात पार पडला. यंदा या सोहळ्यात स्वानंदी-समरच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेने सर्वाधिक पुरस्कार जिंकले. यापैकीच एक महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे ‘सर्वोत्कृष्ट नायक’. समर राजवाडेची मुख्य भूमिका साकारणारा लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट नायक’ ठरला आहे. खरंतर, यापूर्वीही सुबोधने अनेकदा हा पुरस्कार जिंकला आहे. त्यामुळे याचनिमित्ताने त्याने खास भावना व्यक्त केल्या आहेत.

सर्वोत्कृष्ट नायकाचा पुरस्कार जिंकताच सुबोध भावेने ‘झी मराठी’ वाहिनीला एक मोठी विनंती करत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सुबोध म्हणाला, “सगळ्यात आधी ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेची संपूर्ण टीम, पडद्यावर काम करणारे कलाकार, पडद्यामागची टीम सर्वांना हा अवॉर्ड मी समर्पित करतो. कारण, हा तुमचा अवॉर्ड आहे. ‘झी मराठी’चे मनापासून आभार…प्रेक्षकांना सुद्धा मनापासून थँक्यू म्हणतो. मी गेली २५ वर्षं ‘झी मराठी’बरोबर काम करतोय. या क्षेत्रात व्यावसायिक अभिनेता म्हणून पाऊल पडलं ते आधीच्या ‘अल्फा मराठी’ या वाहिनीवर. पहिली मालिका व्यावसायिक अभिनेता म्हणून ‘गीत रामायण’ आणि आताची ‘वीण दोघांतली ही तुटेना’. आजवर ‘झी मराठी’बरोबर मी १९ मालिका केल्या.”

सुबोध पुढे म्हणाला, “एक काळ असा होता जेव्हा आठ, साडेआठ आणि नऊ या सगळ्या स्लॉटला माझ्या मालिका असायच्या. पुरस्कारांपेक्षा मला सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे तो वाहिनीने माझ्यावर दाखवलेला विश्वास. नवीन होतो, कुणीही ओळखत नव्हतं…तेव्हा माझ्या आयुष्यातील पहिली मालिका मला ‘अल्फा मराठी’ वाहिनीवर मिळाली. अभिनेत्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे, उत्तम मालिका आणि उत्तम व्यक्तिरेखा साकारता येणं. आजतागायत माझ्या १९ मालिका आणि १९ व्यक्तिरेखा या लोकांच्या स्मरणात राहिल्या आणि या प्रत्येक मालिकेसाठी, प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी माझा विचार झाला…यासाठी मी ‘झी मराठी’चे मनापासून आभारी आहे.”

“अर्थात ही माझी काही शेवटची मालिका वगैरे नाहीये. मला इथून पुढेही खूप मालिका करायच्या आहेत. पण, माझी झी मराठीला एक विनंती आहे. यानंतर आता वैयक्तिक पुरस्कारासाठी माझा विचार करू नका…हा माझा शेवटचा वैयक्तिक पुरस्कार आहे. यानंतर मी मालिकेसाठीचा वैयक्तिक पुरस्कार घेणार नाही. सर्वोत्कृष्ट मित्र, सर्वोत्कृष्ट भाऊ, सर्वोत्कृष्ट कुटुंब हे इतर पुरस्कार जे जोड्यांमध्ये असतात ते मी घेईन. स्वत:साठीचा हा माझा शेवटचा वैयक्तिक पुरस्कार असेल. यानंतर वैयक्तिक पुरस्कारासाठी माझ्या नावाचा विचार करू नका, याचं कारण म्हणजे माझ्यापेक्षाही उत्तम काम करणारे माझे सगळे सहनायक इथे बसलेले आहेत. त्या नायकांची ही सुरुवात आहे आणि त्यांना हा पुरस्कार मिळावा. कारण, त्यांनाही या शाबासकीची, पुरस्काराची जास्त गरज आहे. मी हा पुरस्कार माझ्या सगळ्या सहनायकांबरोबर इथे स्वीकारू इच्छितो.” असं सुबोध भावेने स्पष्ट केलं आणि नॉमिनेट असलेल्या सगळ्या सहनायकांना मंचावर बोलावून त्यांच्यासह हा पुरस्कार सुबोधने स्वीकारला.

दरम्यान, संपूर्ण कलाविश्वातून सुबोध भावे आणि त्याने घेतलेल्या निर्णयावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.