Bollywood Actress Vidya Balan : अलीकडच्या काळात टेलिव्हिजन मालिकांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीच्या आधारे ठरवली जाते. टीआरपीमध्ये सातत्य राखण्यासाठी महाएपिसोड्स, विविध ट्विस्ट, पाहुण्या कलाकारांच्या एन्ट्री असे नवनवीन उपक्रम वाहिन्यांकडून राबवले जातात. तर, गेल्या काही दिवसांपासून नव्याने सुरू होणाऱ्या मालिकांचं काहीसं हटके प्रमोशन देखील करण्यात येत आहे.

आजपासून ( ३० जून ) ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘कमळी’ ही नवीन मालिका सुरू होत आहे. यामध्ये अभिनेत्री विजया बाबर प्रमुख भूमिका साकारत आहे. खेडेगावात राहणारी, अभ्यासात प्रचंड हुशार आणि मुंबईत जाऊन उच्चशिक्षण घ्यायचं असं स्वप्न पाहणारी ‘कमळी’ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज होत आहे आणि याच ‘कमळी’ची शिक्षका होऊन मालिकेत एन्ट्री घेतेय बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री विद्या बालन.

विद्या आणि कमळीचा एक खास व्हिडीओ ‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये विद्या कमळीला काही प्रश्न विचारते, “देशाची आर्थिक राजधानी कोणती?” यावर कमळी “मुंबई…” असं उत्तर देते. यानंतर विद्या नायिकेला “मुंबईतील विमानतळाचं नाव काय?” असा दुसरा प्रश्न विचारते. यावर कमळी “छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ” असं उत्तर देते.

‘कमळी’ने पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरं अचूक दिल्यामुळे विद्या तिला तिसरा प्रश्न काहीसा हटके विचारते, “दादरवरून डोंबिवलीला जाण्यासाठी तू कोणती ट्रेन पकडशील?” यानंतर मात्र, कमळी गोंधळते आणि म्हणते, “मॅडम मुंबईच्या ट्रेनचा खूप भुल-भुलैय्या असतो बघा…” ‘कमळी’चं उत्तर ऐकताच विद्या तिला सांगते, “म्हणजे आता छडी लागे छम छम”

शेवटी विद्या बालन उच्च शिक्षणासाठी मुंबईत येणाऱ्या ‘कमळी’ला तीन महत्त्वाचे सल्ले देणार आहे. अभिनेत्री म्हणते, “पहिलं म्हणजे वडापाव खाताना लाजायचं नाही”, दुसरी गोष्ट “जीभेवर मराठी भाषेचा गोडवा जपायचा” आणि तिसरी गोष्ट म्हणजे “मनात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर सदैव ठेवायचा”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विद्या बालनच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. हातात छडी, डोळ्याला चष्मा हा अभिनेत्रीचा हटके लूक सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. ‘कमळी’ ही मालिका रोज रात्री ९ वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे.