Popular Actor Entry In Chala Hawa Yeu Dya: काही कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात गाजतात. त्यांचा प्रेक्षकवर्ग मोठा असतो. ‘चला हवा येऊ द्या’ हा त्या कार्यक्रमांपैकी एक आहे. या मराठी विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते.
भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे, निलेश साबळे, भरत गणेशपुरे या कलाकारांनी विविध पात्रे साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. २०१४ मध्ये हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर जवळजवळ १० वर्षे या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. त्यामुळे हा कार्यक्रमाचा एक वेगळा चाहतावर्ग आहे.
आता पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘झी मराठी’ वाहिनीने या कार्यक्रमाचा टीझर प्रदर्शित केला होता. त्यामुळे या कार्यक्रमात कोणकोणते कलाकार दिसणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. सध्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये ऑडिशन सुरू आहे.
‘हा’ लोकप्रिय अभिनेता ‘चला हवा येऊ द्या’मध्ये झळकणार
या ऑडिशनच्या पोस्टरवर श्रेया बुगडे, कुशल बद्रिके व भरत गणेशपुरे यांचे फोटो आहेत. त्यामुळे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हे कलाकार दिसणार असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. याबरोबरच, चला हवा येऊ द्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिजीत खांडकेकर करणार असल्याचे म्हटले जात आहे.
आता या कार्यक्रमात आणखी एक लोकप्रिय अभिनेता सहभागी होत असल्याचे समोर आले आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका अभिनेत्याची झलक पाहायला मिळत आहे.
हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून प्रियदर्शन जाधव आहे. लाल रंगाचा सूट, वाढवलेले केस आणि दाढी, हातात बंदूक अशी प्रियदर्शनची झलक पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना “खबर आहे गावागावात, कॉमेडीचा डॉन परत येतोय थाटात”, अशी कॅप्शन दिली आहे. तसेच आज प्रोमो प्रदर्शित होणार असल्याचेदेखील म्हटले आहे.
प्रियदर्शन जाधव ‘चला हवा येऊ द्या’च्या पहिल्या सीझनमध्येदेखील दिसला होता. झी मराठीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये प्रियदर्शन जाधवलादेखील टॅग केले आहे. यावर काहींनी कमेंट करत प्रियदर्शनला बघण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे. कुशल बद्रिकेने हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. आता प्रोमोनंतर हा शो नेमका कधी पासून सुरू होणार, यामध्ये आणखी कोणते कलाकार दिसणार हे समोर येणार आहे.
दरम्यान, राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी निलेश साबळेबाबत एक पोस्ट शेअर केली होती. त्यांच्या या पोस्टला अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत उत्तर दिले होते. निलेशला मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी पाठिंबा दिल्याचे दिसले.