Zee Marathi : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या १३ एप्रिलपासून महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत. ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या दोन मालिका आता दुपारच्या सत्रात प्रसारित केल्या जाणार आहेत. यामुळेच ‘झी मराठी’वर ‘आपली दुपार’ हे सत्र सुरू होईल. याशिवाय अन्य लोकप्रिय मालिकांच्या वेळेतही वाहिनीने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

छोट्या पडद्यावरील मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीच्या आधारे ठरवली जाते. याच टीआरपीच्या दृष्टीकोनातून ‘झी मराठी’वर काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ‘तारिणी’ मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. यासह ‘तारिणी’ ९:३० वाजताची स्लॉट लीडर सुद्धा आहे. त्यामुळे प्रेक्षकांचं जास्तीत जास्त मनोरंजन करण्यासाठी आता ‘तारिणी’ मालिकेची वेळ १५ मिनिटं वाढवण्यात आली आहे. १३ एप्रिलपासून ‘तारिणी’ मालिका रात्री ९:३० ते १०:१५ अशी ४५ मिनिटं प्रसारित केली जाईल.

‘देवमाणूस’ मालिका सुद्धा पाऊण तास प्रसारित केली जाणार आहे. तर, ‘तुला जपणार आहे’ या थ्रिलर मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. ही मालिका आता दररोज रात्री ११ वाजता ऑन एअर होईल.

Award Banner

झी मराठीवर ‘असा’ होणार बदल

दुपारचं सत्र

  • सावळ्याची जणू सावली – दुपारी १ वाजता
  • लक्ष्मी निवास – दुपारी १.३० ते २.३० वाजेपर्यंत

सायंकाळ व रात्रीचं सत्र

  • शुभ श्रावणी – सायंकाळी ६.३० ते ७.१५ वाजेपर्यंत
  • वीण दोघांतली ही तुटेना – ७.१५ ते ८.०० वाजेपर्यंत
  • तारिणी – रात्री ९.३० ते १०.१५ वाजेपर्यंत
  • देवमाणूस – रात्री १०.१५ ते ११ वाजेपर्यंत
  • तुला जपणार आहे – रात्री ११ वाजता

दरम्यान, १३ एप्रिलपासून हे नवीन बदल लागू होतील. आता यानंतर ‘झी मराठी’वरील मालिकांच्या टीआरपीत कसा फरक पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

याशिवाय १३ तारखेपासून ‘दीप ज्योती’ ही नवीन मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये पूर्वा कौशिक आणि प्रसाद जवादे यांची जोडी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ही मालिका आठ वाजताच्या प्राइम स्लॉटला प्रसारित केली जाईल.