Zee Marathi Serial Lakshmi Niwas New Time : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या १३ एप्रिलपासून ‘दीप ज्योती’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या सिरियलला प्राइम स्लॉट देण्यात आला आहे. ‘दीप ज्योती’ मालिका रात्री आठ वाजता ऑन एअर होईल. सध्या या वेळेला हर्षदा खानविलकरांची कौटुंबिक मालिका ‘लक्ष्मी निवास’ प्रसारित केली जाते. ‘दीप ज्योती’ची वेळ जाहीर झाल्यावर ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचं काय होणार? असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. अखेर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना ‘झी मराठी’ने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोतून मिळाली आहेत.

‘लक्ष्मी निवास’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या दोन लोकप्रिय मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सुरुवातीला या मालिका सायंकाळी दाखवल्या जातील असा प्रेक्षकांचा समज होता. पण, यामध्येच ‘झी मराठी’ने एक मोठा ट्विस्ट आणला आहे.

‘झी मराठी’वर आता ‘आपली दुपार’ हा नवीन सेगमेंट सुरू होणार आहे. त्यामुळे ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या दोन्ही मालिका आता दुपारी प्रसारित केल्या जातील. वाहिनीवर १३ एप्रिलपासून दुपारचं सत्र सुरू होईल.

Award Banner

झी मराठी : ‘आपली दुपार’, मालिकांची नवीन वेळ…

  • सावळ्याची जणू सावली – दुपारी १ वाजता
  • लक्ष्मी निवास – दुपारी १.३० वाजता ( १ तास )
  • आम्ही सारे खवय्ये – दुपारी २.३० वाजता

‘लक्ष्मी निवास’ मालिका आता दुपारी दीड ते अडीच अशी एक तास प्रसारित केली जाईल. तर, सारंग-सावलीची ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका दुपारी १ वाजता ऑन एअर होईल. या दोन्ही मालिकांची वेळ बदलल्यावर प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे बदल १३ एप्रिलपासून लागू होतील.

दरम्यान, ‘दीप ज्योती’ या नव्या मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये ‘शिवा’ फेम पूर्वा कौशिक आणि ‘पारू’ फेम अभिनेता प्रसाद जवादे प्रमुख भूमिका साकारणार आहे. याशिवाय यामध्ये ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक सुद्धा झळकणार आहेत. ते प्रसादच्या वडिलांची भूमिका साकारतील.