‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या १३ एप्रिलपासून एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शिवा’ फेम लोकप्रिय अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि ‘पारू’ फेम लोकप्रिय अभिनेता प्रसाद जवादे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. ‘झी मराठी’ने ‘दीप ज्योती’ला प्राइम स्लॉट दिला आहे. ही मालिका रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या मालिकेच्या निमित्ताने एक प्रसिद्ध अभिनेत्री मालिकाविश्वात कमबॅक करतेय. ती कोण आहे जाणून घेऊयात…

‘दीप ज्योती’ ही गोष्ट आहे प्रेमाने आपुलकीने बांधलेल्या बहीण भावांच्या नात्याची… ज्योती, तिच्या दोन बहिणी आणि भावाची ही गोष्ट आहे. ज्योतीच्या परिवाराची कहाणी अशी की ज्योतीचे वडील दारू प्यायचे, दारूतच त्यांनी स्वतःच्या आयष्याची वाट लावली आणि संपूर्ण जबाबदारी ज्योतीच्या मोठ्या भावावर म्हणजेच अभिजीतवर येऊन पडली. लहान वयातच त्याला शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली. या घरातील लोकांकडे पैसे नसले तरी सुद्धा आनंदाचं वातावरण आहे. ज्योतीला शिकून चांगली नोकरी करण्याची इच्छा आहे.

सुहास परांजपेचं कमबॅक

तर, दुसरीकडे आहे एक घरंदाज कुटुंब. या कुटुंबाचे प्रमुख आहेत पुरुषोत्तम आणि तीन मुलं आहेत. स्वराज, दीप, विराज आणि यांच्याबरोबर राहत असते त्यांची आत्या. या पुरुषोत्तमची भूमिका साकारणार आहेत ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक आणि आत्याची भूमिका साकारणार आहे अभिनेत्री सुहास परांजपे. त्यांनी आजवर ‘दार उघड बये’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘आंबटगोड’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे. दीपला त्याची आत्या आईप्रमाणे जीव लावत असते. सुहास परांजपे साकारणार असलेल्या भूमिकेचं नाव आहे सुलोचना…जिला प्रेमाने सगळे सुलू आत्या म्हणतात.

स्वराज पुरुषोत्तमची कार्बन कॉपी असून त्याला आपल्या वडिलांचा शून्यातून उभा केलेला बिजनेस पुढे न्यायचाय. विराज मात्र स्वतःच्या नोकरीमध्ये आनंदी आहे. दीप लहान असताना त्याची आई गेल्याने आपल्या बायकोच्या मृत्यूला दीपचं जबाबदार आहे अशी पुरुषोत्तम यांची धारणा झाली. तेव्हापासून ते दीपचा तिरस्कार करतात. आई गेल्यानंतर दीपराज दारूच्या आहारी गेलेला आहे. आता दीप आणि ज्योती कसे भेटणार? त्यांचा प्रवास कसा सुरु होणार? हे पाहणं मनोरंजक असणार आहे.

यामध्ये प्रसाद जवादे ( दीप ), पूर्वा कौशिक ( ज्योती ), डॉ. गिरीश ओक, सुहास परांजपे यांच्या महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत. या मालिकेचे दिग्दर्शक आहेत अमित सावर्डेकर. १३ एप्रिलपासून ‘दीप ज्योती’ मालिका रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल.