Asmita Deshmukh aka Dimple Entry in Devmanus Madhla Adhyay: गावाकडील पार्श्वभूमी असलेली देवमाणसाची गोष्ट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. पैशाच्या हव्यासापोटी एक माणूस कोणते टोक गाठू शकतो हे या मालिकेत पाहायला मिळते. विशेष म्हणजे ही व्यक्ती खून करते, निष्पाप, गरजू आणि सुंदर महिलांना स्वत:च्या जाळ्यात ओढते, त्यांच्याकडील पैसे-दागदागिने मिळवते आणि त्यांना मारून टाकते. हे सगळे ती इतक्या सराईतपणे करते की त्याचे गुन्हे सहजासहजी पोलीस किंवा इतरांसमोर येत नाही. जरी संशय असला तरी त्याच्याविरुद्ध पुरावे सापडत नाहीत.

हीच व्यक्ती समाजासमोर मात्र चांगले असल्याचे दाखवते. सर्वांसमोर संकटात असलेल्या एखाद्याला वाचवते, मदत करते; त्यामुळे कोणीही तिच्यावर संशय घेत नाही. ही व्यक्ती म्हणजे देवमाणूस मालिकेतील गोपाळ आहे.

गोपाळ हा खरा गोपाळ नसून तो डॉक्टर अजितकुमारच आहे. त्याने अनेक वर्षांपासून घरापासून दूर असलेल्या गोपाळला मारून त्याची जागा घेतली आहे. त्याने लालीबरोबर संसार थाटला. लाली त्याच्या प्रेमात आहे. गोपाळ मात्र स्वार्थासाठी तिच्याबरोबर राहत आहे. गोपाळचे तिच्यावर प्रेम नाही. लाली गोपाळसाठी, त्याचे प्रेम मिळवण्यासाठी काहीही करू शकते. तिने याआधी माधुरी व आर्याचा तसेच श्यामलचा खून केला आहे. पैशांसाठी गोपाळ व लालीमध्ये मोठे भांडणही झाले होते. गोपाळने लालीला किडनॅप केले होते. तिथून निसटत लालीने गोपाळला शिक्षा व्हावी म्हणून स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला होता. जेव्हा गोपाळला शिक्षा सुनावली जाणार होती, त्यावेळी तिने पुन्हा सर्वांसमोर येत गोपाळला वाचवले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नुकतेच त्यांच्यातील भांडण मिटले आहे.

आता या सगळ्यात डिंपलची एन्ट्री होणार आहे. देवमाणूस व देवमाणूस २मध्ये डॉक्टर अजितकुमार उर्फ देवीसिंगच्या सगळ्या कट कारस्थानात, खूनात साथ देणारी डिंपल आहे. तिने अजितकुमारबरोबर लग्नही केले होते. आता देवमाणूस मधला अध्याय या मालिकेत डिंपल दिसणार आहे. या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे.

“आता आमच्या संसाराला कुणाचीच नजर…”

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर देवमाणूस-मधला अध्याय या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, गोपाळ व लाली एका मंदिरात आहे. लाली गोपाळच्या हातात एक गंडा बांधत असल्याचे दिसते. ते बांधत असतानाच ती म्हणते, “हा गंडा परक्या बायकांपासून तुमचं रक्षण करेल.” हे ऐकल्यानंतर गोपाळ मनातल्या मनात म्हणतो, “एवढ्या बायकांचा गुंता सोडवला पण हिनं माझाचं गुंता केला”, त्यानंतर ते दोघेही देवासमोर हात जोडून उभे असल्याचे दिसते. लाली प्रार्थना करत म्हणते, “आता आमच्या संसाराला कुणाचीच नजर नको लागू दे.” तेवढ्यात एक मुलगी येते. ती गोपाळला डॉक्टर अशी हाक मारते आणि त्याला मीठी मारते. तिला पाहून गोपाळला धक्का बसतो. तर डिंपला गोपळला भेटून खूश होते. लाली मनातल्या मनात म्हणते, “भटक्या नवऱ्याला कितीही शिकवलं तर येडं बनून पेढचं खाणार.”

हा प्रोमो शेअर करत झी मराठी वाहिनीने, “देवमाणसाच्या खेळात डिंपलची होणार खतरनाक एंट्री”, अशी कॅप्शन दिली आहे. आता प्रोमो पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आनंद व्यक्त केला आहे. एकाने लिहिले, “डिंपल तुझं स्वागत आहे. तू आलीस तर आता मजा येणार”, दुसऱ्याने लिहिले, “डिंपलला बघून कोरोनाच्या दिवसातली आठवण झाली”, एकाने लिहिले, “अस्मिता देशमुख खूप वाट पाहिली”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

आता डिंपलच्या येण्याने गोपाळ उर्फ देवीसिंग काय नवीन कारस्थान करणार, लाली या सगळ्याला कशी सामोरी जाणार, डिंपल नेमकं काय करणार, डिंपलमुळे त्याची खरी ओळख सर्वांसमोर येणार का, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.