Zee Marathi Devmanus Serial : ‘देवमाणूस’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून एकापेक्षा एक खतरनाक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. गोपाळ म्हणून गावात वावरणाऱ्या अजितने नुकताच आर्याचा खून केलाय. ही आर्या इन्स्पेक्टर मार्तंड जामकरची बहीण असते. आता आर्याचा काटा काढल्यामुळे अजित पुन्हा एकदा गावात बिनधास्त वावरू लागला आहे. त्याची पत्नी लाली सुद्धा तेवढीच हुशार असते. आपल्या नवऱ्यावर ती बरोबर लक्ष ठेवून असते.

‘देवमाणूस’ मालिकेत येणारे हे एकापेक्षा एक जबरदस्त ट्विस्ट चाहत्यांच्या सुद्धा पसंतीस उतरले आहेत. यामुळेच गेली काही महिने ही मालिका रात्री १० वाजताची स्लॉट लीडर ठरत आहे. ‘देवमाणूस’ला चांगला टीआरपी मिळताना दिसतोय. अशातच मालिकेत आता एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. “हे नवीन पाखरू अजितकुमार हेरणार की स्वत:च जाळ्यात अडकणार” असं कॅप्शन देत ‘झी मराठी’ वाहिनीने हा प्रोमो शेअर केला आहे.

आता ‘देवमाणूस’मध्ये एन्ट्री घेणारी ही अभिनेत्री नेमकी आहे तरी कोण? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला होता. कारण, प्रोमोमध्ये फक्त अभिनेत्री पाठमोरी चालताना दिसतेय. पण, ही अभिनेत्री कोण आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. कारण, तिने स्वत:च याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

झी मराठीच्या ‘देवमाणूस’मध्ये एन्ट्री घेणारी ही हसीना दुसरी-तिसरी कोणी नसून अभिनेत्री मृणाल साळुंखे आहे. ती अभिनेत्री, मॉडेल व डान्सर म्हणून ओळखली जाते. यापूर्वी मृणालने ‘आई तुळजाभवानी’ आणि ‘जय-जय स्वामी समर्थ’ या ‘कलर्स मराठी’वर प्रसारित होणाऱ्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे.

आता मृणालच्या एन्ट्रीनंतर मालिकेत काय ट्विस्ट येणार? ती अजितकुमारच्या जाळ्यात अडकणार की अजितला अडकवण्यासाठी हा रचलेला डाव आहे हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

दरम्यान, ‘देवमाणूस’ ही मालिका ‘झी मराठी’वर रोज रात्री १० वाजता प्रसारित केली जाते. हा या मालिकेचा तिसरा भाग आहे. टीआरपीमध्ये देखील मालिकेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. यामध्ये अभिनेता किरण गायकवाड प्रमुख भूमिका साकारत आहे.