Devmanus Upcoming Twist: ‘देवमाणूस’ या मालिकेतील गोपाळ क्रूरपणे खून करतो. खून केल्यानंतर तो मृत शरीरे लपवून ठेवतो आणि त्यांच्याकडील पैसे घेतो, असे पाहायला मिळते. इतकेच नाही, तर इतके गुन्हे करूनही त्याचे गुन्हे सर्वांसमोर येत नाहीत इतक्या शिताफीने तो सर्व गुन्हे लपवतो.
सर्वांसमोर तो सर्वोत्तम मुलगा, एक चांगला मित्र, नवरा, भाऊ, माणूस म्हणून वावरतो. गावकरी त्याला देवमाणूस म्हणतात आणि त्यामुळेच त्याच्यावर कोणते संकट आले किंवा पोलिसांना त्याच्यावर संशय आला, तर गावकरी गोपाळ, असे करूच शकत नाही, असे म्हणतात.
या सगळ्यात गोपाळची पत्नी लालीला त्याच्या या कारस्थानांबद्दल, त्याच्या गुन्ह्यांबद्दल माहीत झाले आहे. तसेच, तिने त्याच्या प्रेमात पडलेल्या माधुरी व आर्याची हत्या केली आहे. त्याचप्रमाणे तिने गोपाळचे पैसेही लपवून ठेवले. ते पैसे मिळवण्यासाठी गोपाळने तिला मारहाण केली, तिचा छळ केला. पैसे कुठे ठेवलेत, हे तो तिला सतत विचारत राहिला.
पैसे मिळविण्यासाठी त्याने लालीच्या आईवरही हल्ला केला. मात्र, लालीने त्याला पैसे कुठे ठेवलेत हे कळू दिले नाही. गोपाळने डांबून ठेवलेल्या ठिकाणाहून सुटल्यानंतर ती एका हॉटेलमध्ये लपली. त्यानंतर तिने गोपाळला धडा शिकविण्यासाठी कारस्थाने करायला सुरुवात केली.
आता लालीमुळे गोपाळला तुरुंगात जावे लागणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने देवमाणूस मधला अध्याय मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे.
लालीमुळे गोपाळ जाणार तुरुंगात
या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, गोपाळ एक चिठ्ठी वाचत आहे. त्यावर लिहिलेले असते, अटक मटक पुरावे चटक, पापांचा आला पूर, पूर काही संपेना, तुझ्यापर्यंत कोणी पोहोचना, घरचा पाहुणा उडाला, गोडाऊनपर्यंत जाऊन पोहोचला… याचदरम्यान, पोलीस इन्स्पेक्टर मार्तंड जामखंडे गोपाळच्या दुकानात जातो. त्याच्या कॉलरला धरून, त्याला दुकानाबाहेर आणतो. त्यानंतर त्याला बेड्या दाखवतो आणि पोलिस त्याला गावातून फिरवतात. जामखंडे म्हणतो की, या देवमाणसाचं सगळ्या गावाला दर्शन करू. संपूर्ण गाव गोळा झाल्याचे दिसते. लालीची आई येते, ती त्याला कानाखाली मारते. ती त्याला म्हणते, “सांग, माझी लाली कुठे आहे सांग.”
लाली हे सगळं लूपन बघत असते. ती मनात म्हणते, “ही तर फक्त सुरुवात आहे.” प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, गोपाळला तुरुंगात नेले जाते. जामखंडे म्हणतात की, पत्नीचा खून केला, असा गुन्हा याच्यावर दाखल करा. गोपाळ घाबरल्यासारखा दिसतो.
दरम्यान, आता मालिकेत नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
