Zee Marathi Serial TRP : सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये टीआरपीसाठी जबरदस्त चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रत्येक मालिकेची टीम ‘स्लॉट लीडर’ होण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतेय. तेजश्री प्रधानची मुख्य भूमिका असलेली ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेकडून पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या आणि याचं कारण म्हणजे तेजश्री प्रधान व सुबोध भावे यांची ऑनस्क्रीन जोडी.
आजवरच्या तेजश्री प्रधानच्या प्रत्येक मालिकेला छोट्या पडद्यावर भरभरून यश मिळालेलं आहे. आता याचीच पुनरावृत्ती झालेली आहे. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका ७:३० वाजताची स्लॉट लीडर ठरली आहे. ‘BARC इंडिया’कडून नुकताच ३ जानेवारी ते ९ जानेवारी या दरम्यानच टीआरपी शेअर करण्यात आला आहे.
तेजश्रीच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत सध्या ‘सत्तापालट होणार’ हा ट्रॅक सुरू आहे. एवढे महिने या शोची संपूर्ण टीम स्लॉट लीडर होण्याच्या प्रतीक्षेत होती, त्यामुळे हे यश मिळाल्यावर “खऱ्या अर्थाने सत्तापालट झाला!” असं कॅप्शन देत वाहिनीने पोस्ट शेअर केली आहे.
गेले काही महिने ७:३० वाजताच्या स्लॉटला स्टार प्रवाहची ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका सातत्याने स्लॉट लीडर ठरत होती. पण, नुकतीच या मालिकेची वेळ बदलण्यात आली असून, याजागी मधुराणी प्रभुलकरची मुख्य भूमिका असेलली ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका ऑन एअर केली जाते.
याशिवाय नऊच्या स्लॉटला पुन्हा एकदा ‘कमळी’ने अधिराज्य गाजवलं आहे. इतकंच नव्हे तर ‘कमळी’ने ‘झी मराठी’वर सर्वाधिक टीआरपी मिळवला आहे.
‘झी मराठी’च्या पाच मालिका ठरल्या स्लॉट लीडर
- कमळी ( ९ वाजता स्लॉट लीडर ) – ४.१ TVR
- वीण दोघांतली ही तुटेना ( ७:३० वाजता स्लॉट लीडर ) – ३.९ TVR
- तारिणी ( ९:३० वाजता स्लॉट लीडर ) – ३.८ TVR
- देवमाणूस ( १० वाजता स्लॉट लीडर ) – ३.१ TVR
- तुला जपणार आहे ( १०:३० वाजता स्लॉट लीडर ) – २.८ TVR
दरम्यान, नवीन वर्षांच्या पहिल्याच आठवड्यात ‘कमळी’, ‘वीण दोघांतली ही तुटेना’, ‘तारिणी’, ‘देवमाणूस’, ‘तुला जपणार आहे’ या पाचही मालिकांनी बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांसह चाहत्यांनी या सगळ्या मालिकेच्या कलाकारांचं भरभरून कौतुक केलं आहे.
