Zee Marathi : जेव्हा प्रेक्षकांच्या दोन लाडक्या मालिका एकत्र येतात, तेव्हा छोट्या पडद्यावर जो धमाका होतो, त्याची मजा काही वेगळीच असते! ‘झी मराठी’वर सध्या ‘कमळी’ आणि ‘सनई चौघडे’ या दोन मालिकांचा विशेष ‘महासंगम’ सुरू आहे. जेव्हा दोन वेगवेगळ्या मालिकांचे कलाकार एकमेकांना भेटतात, तेव्हा कथेमध्ये फक्त संवाद नाही तर प्रचंड ड्रामा, अनपेक्षित ट्विस्ट आणि थरारक वळण पाहायला मिळतं. सध्याच्या कथानकानुसार, एकीकडे ‘कमळी’ आपल्या उदरनिर्वाहासाठी नोकरीच्या शोधात भटकत आहे. तर दुसरीकडे, ‘सनई चौघडे’ मालिकेत जय आणि शर्वरी हे आसावरी-गौतमच्या लग्नासाठी धडपड करताना दिसताहेत. अशाच एका कठीण प्रसंगात जय, शर्वरी, हृषी आणि कमळी यांची भेट होणार आहे.
जय, शर्वरी, ऋषी आणि कमळी हे चौघे मिळून एक मोठा निर्णय घेणार आहेत. हे लोक आसावरी आणि गौतम यांचं नाव एका सामुहिक विवाह सोहळ्यासाठी नोंदवणार आहेत. विशेष म्हणजे, हा सामुहिक विवाहसोहळा राजन यांनी ‘अन्नपूर्णा’ यांच्या नावाने आयोजित केला आहे. सर्व काही सुरळीत चालू असतानाच, या सोहळ्यात विघ्न आणण्यासाठी दोन खलनायिका अनिका आणि समायरा एकत्र येणार आहेत. या दोन्ही खलनायिका या महासंगमात एकत्र येऊन काहीतरी नवीन कट रचणार आहेत. आता या खलनायिकांच्या कारस्थानामुळे आसावरी आणि गौतम यांचं लग्न यशस्वीपणे पार पडेल का? की या सगळ्या गोंधळात जय, शर्वरी, हृषी आणि कमळी सुद्धा अडकले जातील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या महासंगमात मिळणार आहेत.
‘कमळी’ म्हणजेच विजया बाबरने या महासंगम शूटचा अनुभव सांगितला आहे. ती म्हणाली, “आमच्या मालिकेचा हा तिसरा महासंगम आहे… पहिला ‘तारिणी’, दुसरा ‘लक्ष्मी निवास’ आणि आता ‘सनई चौघडे’ मालिकेच्या टीमसह हा तिसरा महासंगम. खूप मजा येते… राजूसरांबरोबर आम्हाला सर्वांनाच काम करायचं होतं आणि आम्ही खूप उत्साहात होतो. महासंगम शूट करणं कठीण असतं कारण, इतके लोक असतात आणि पूर्ण १ तासाचा भाग शूट करायचा असतो. त्यात उन्हाळा आहे…यात सुद्धा आम्ही प्रत्येक सीनची जोमाने तयारी करतो.” आता या महासंगम भागात हृषी कमळीच्या नात्याला सुद्धा एक वेगळी अन् नवीन दिशा मिळणार आहे.
‘कमळी’ आणि ‘सनई चौघडे’ या मालिकांचा महासंगम २२ मे पर्यंत सुरू राहणाह आहे. आता या दरम्यान कोणता धमाका होणार? आसावरी-गौतमचं लग्न होणार का? हे लवकरच पाहायला मिळेल. हा महासंगम ८:३० ते ९:३० या वेळेत ‘झी मराठी’वर प्रेक्षकांना पाहता येईल.
