Zee Marathi Serial Kamali & Tarini : ‘झी मराठी’ वाहिनीवर गेल्या आठवड्यात प्रेक्षकांना ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ या दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळाला. दोन्ही नायिका कॉलेजमध्ये नेमकं ड्रग्ज कोण पुरवतंय याचा शोध घेण्यासाठी एकत्र येतात. एवढंच नव्हे तर कामिनी आणि युवराज हे दोघं मिळून कौशिकी खांडेकरला यावेळी जीवे मारण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कमळी वेळीच फुलांच्या हारामध्ये लपवलेला बॉम्ब पाहते आणि तारिणीच्या मदतीने हा बॉम्ब निष्क्रिय करते. यामुळे कौशिकीचा जीव थोडक्यात वाचतो. अशी थ्रिलिंग गोष्ट या महासंगम विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

दमदार कलाकार, हटके ट्विस्ट यामुळे या दोन मालिकांच्या महासंगमला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ या दोन्ही मालिका स्लॉट लीडर ठरल्या आहेत. म्हणजेच अन्य स्पर्धक वाहिन्यांवर रात्री ९ ते १० दरम्यान प्रसारित होणाऱ्या मालिकांच्या तुलनेत ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ला गेल्या आठवड्यात ( ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर ) सर्वाधिक टीआरपी मिळाला आहे.

‘कमळी’ मालिकेला पहिल्या दिवसापासून चांगला टीआरपी मिळत होता. याशिवाय झी मराठीवर ही मालिका अव्वलस्थानी आहे. आता ‘कमळी’ आणि ‘तारिणी’ यांच्या महासंगममुळे टीआरपीमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. या महासंगमला ४.१ एवढं रेटिंग मिळालं आहे. यामुळे झी मराठीने पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहे.

‘कमळी’ आणि ‘तारिणी’ या दोन्ही मालिका रात्री ९ ते १० या कालावधीच्या स्लॉट लीडर ठरल्या आहेत. यामुळे झी मराठीने “महासंगमचा महाविजय” असं कॅप्शन देत ही खास पोस्ट चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. प्रेक्षकांनी सुद्धा या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

“झी मराठी कित्येक वर्षांनी स्लॉट लीडरचा मान मिळाला…मस्तच”, “तारिणी कमळी दोन्ही टीमचं अभिनंदन स्टोरी लाइन उत्तम होती”, “खूप छान स्टोरी होती”, “आजपर्यंतचा बेस्ट महासंगम होता कारण स्टोरी एकदम थ्रिलिंग होती..जय भवानी” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये दिल्या आहेत.