Kamali Upcoming Twist: कमळी या मालिकेत सध्या एकापेक्षा एक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. कमळीच्या आयुष्यात सतत काही ना काही अडचणी येत आहेत. काही दिवसांपासून अनिका सर्वांसमोर चांगले वागण्याचे नाटक करत आहे.
कमळी, तसेच इतर कुटुंबीयांसमोर ती किती चांगली आहे, तिच्यात बदल झाले आहेत. तिने कमळीचा बहीण म्हणून स्वीकार केला आहे, असे दाखवते. पण, खरे तर तिला कमळीच्या नकळत कमळीला त्रास द्यायचा आहे. तिला त्रासही झाला पाहिजे आणि तिचे नावही कुठे येऊ नये, तिची प्रतिमा चांगली राहावी यासाठी अनिका प्रयत्न करते.
“मला तुझी माफी मागण्याची…”
कमळीला त्रास व्हावा, ऋषी तिच्या बाजूने व्हावा आणि तिच्या प्रेमात पडावा यासाठी अनिका वेगवेगळे प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच तिने तिच्या वर्गातील एका मुलाला कमळीला प्रपोज करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. तिलाही तू आवडतोस हे त्याला पटवून दिले. आता मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, ऋषी आणि अनिका दोघे एकमेकांशी बोलत आहेत. अनिका आतापर्यंत ज्या पद्धतीने ऋषीबरोबर वागत होती, त्यासाठी ती त्याची माफी मागते. ती म्हणते, “मला तुझी माफी मागण्याची कधी संधी मिळाली नाही. तू माझा क्रश होतास. आताही क्रश आहेस; पण प्रेम करायला मी कोणावर जबरदस्ती करू शकत नाही. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू माझ्याबद्दल विचार करशील.”
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, कमळीचा वर्गमित्र तिला म्हणतो की, मला तु्झ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यानंतर तो तिला एका वर्गात घेऊन जातो. जेव्हा कमळी वर्गात जाते. तेव्हा तेथील दृश्य पाहून तिला धक्का बसतो.
संपूर्ण वर्ग सजवलेला असतो. तसेच, माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं फळ्यावर लिहिलेलं असतं. तिथे फुगे, फुले आणि सजावट केली असल्याचं तिला पाहायला मिळतं. तसेच फुलांनी आय लव्ह यू, असेही लिहिलेले पाहायला मिळते.
तो मुलगा कमळीला म्हणतो की, माझ्या आयुष्याच्या प्रश्न आहे. कमळी त्याला रागाने विचारते की, हे सगळं काय चाललं आहे? तिचा मित्र म्हणतो, “हेच तर इतके दिवस तुला सांगायचं होतं.” तितक्यात अनिका, ऋषी, कॉलेजचे प्राचार्य आणि कमळीचे इतर वर्गमित्र तिथे येतात. प्राचार्य रागाने विचारतात की, तुम्ही दोघे इथे वर्गात काय करत आहात? ऋषीच्या चेहऱ्यावरदेखील प्रश्नचिन्ह पाहायला मिळत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘ही प्रेमाची कबुली ऋषी आणि कमळीला महागात पडणार का?’, अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत नेमकं काय घडणार, ऋषी त्याचं प्रेम व्यक्त करणार का, कमळी या सगळ्यातून कधी बाहेर पडणार आणि अनिकाचा खरा चेहरा सर्वांसमोर कधी येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
