Kamali upcoming twist: सिद्धटेक या गावातून कमळी मुंबईसारख्या मोठ्या शहरात शिक्षणाप्रमाणेच तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आली. मात्र, मुंबईत आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच कमळीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. अनिकाने सुरुवातीला तिला कॉलेजमध्ये प्रवेश मिळू नये यासाठी अनेक प्रयत्न केले. आजी कामिनी आणि आई रागिणीच्या मदतीने तिने कमळीविरुद्ध कट-कारस्थाने केली. अगदी पेपर लिहिताना तिने कॉपी केली आहे, असेही आरोप तिच्यावर करण्यात आले. मात्र, कमळीने प्रत्येक वेळी प्रत्येक संकटाचा धीराने सामना केला आणि प्रत्येक अडचणीतून मार्ग काढला. या सगळ्यात तिला तिची मैत्रीण निंगी, मित्र बंड्या, तसेच हृषी आणि अन्नपूर्णाआजी, राजन या सगळ्यांची वेळोवेळी मदत झाली. अनिकाने केलेल्या अनेक कारस्थानांनंतरही कमळी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली
कमळीच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक चढ-उतार आले. वर्षभराने जेव्हा कमळी गावी परतली त्यावेळी तिच्या आजोबांचे म्हणजेच आबांचे निधन झाल्याचे कमळीला समजले. गावाकडे आल्यानंतर अनेक गोष्टींचा तिच्यासमोर उलगडा झाला. तिची आई गौरी ऊर्फ सरोज ही मुंबईत नयनताराच्या घरी काही दिवस राहिली होती, हेही तिला समजले. या सगळ्यात कमळीने मुंबईला परतणार नाही, असे ठरवले. हृषीने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आबा गेल्याच्या दुखातून तिला सावरण्यासाठी आणि तिची शिक्षणासह अनेक स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तिने मुंबईत परत यावे, हे समजावून सांगण्यासाठी हृषी तिच्या गावी गेला. हृषी कमळीच्या गावी गेला आहे हे समजताच नयनताराही सिद्धटेकला गेली. हृषी आणि कमळीमधील वाढती जवळीक पाहून तिने कमळीला वाईट शब्दांत सुनावले. तसेच तिला तिच्या वडिलांबद्दलही विचारले.
कमळीवर मोठे संकट कोसळणार
आता कमळी मालिकेचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. त्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सरोज तिच्या मुलीला म्हणजेच कमळीला तिचे वडील कोण आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. तिचे वडील दुसरे-तिसरे कोणी नसून राजन आहेत हे समजण्याआधीच कमळीवर मोठे संकट कोसळणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, कमळीची आई तिला म्हणते, “मी जे काही सहन केले, तोच त्रास तुला झालेला मला सहन होणार नाही.”
पुढे ती कमळीला म्हणते, “तुला तुझ्या बापाचं नाव कळल्यानंतर तुझं नाव होणार आहे, कमळी रा… “, सरोज तिला तिच्या वडिलांचे नाव सांगत असते, तोपर्यंत कमळीवर एक व्यक्ती गोळी झाडत असल्याचे ती पाहते आणि कमळीला बाजूला ढकलते. ती गोळी सरोजला लागते आणि ती उंच भागावरून खाली पडते. हे सर्व पाहून कमळीला धक्का बसतो. कामिनीने त्या माणसाला कमळीला संपवण्यास सांगितले असून, तीदेखील तिथे असल्याचे पाहायला मिळते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वहिनीने, ‘सत्य उलगडण्यापूर्वीच कमळीवर आभाळ कोसळणार’, अशी कॅप्शन दिली आहे. आता कमळी तिच्या आईला वाचवू शकणार का, तिचे वडील कोण आहेत हे तिला कधी समजणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
