Zee Marathi Krushnaichya Leki New Serial Updates : निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असलेली ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका येत्या १५ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना तीन मुलींना खंबीरपणे सांभाळणाऱ्या एका आईची गोष्ट पाहायला मिळेल. मुलींच्या जन्मानंतर पतीने साथ सोडूनही कृष्णाई खचली नाही. खानावळ चालवून तिने आपल्या तिन्ही मुलींना शिक्षण दिलं, त्यांच्यावर योग्य संस्कार केले. कृष्णाईच्या तीन मुलींचा प्रवास या मालिकेचा केंद्रबिंदू आहे.

कृष्णाईच्या मोठ्या मुलीचं नाव आहे शारदा, दुसऱ्या मुलीचं नाव आहे गौरी आणि सगळ्यात लहान मुलीचं नाव आहे सौदामिनी. यापैकी गौरी बंडखोर स्वभावाची असून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धैर्य तिच्यात आहे. गौरी शिक्षणात प्रचंड हुशार असते आणि भविष्यात कलेक्टर व्हायचं असं तिचं स्वप्न असतं. आता तिच्या आयुष्यात येणारा हिरो देखील अगदी तसाच आहे. डॅशिंग, रुबाबदार आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा…ही भूमिका कोण साकारणार याबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू होती. मात्र, प्रोमोची पहिली झलक पाहूनच ही भूमिका अभिनेता रोहित परशुराम साकारणार असल्याचं प्रेक्षकांनी ओळखलं होतं. आता याचा अधिकृत प्रोमो समोर आला आहे.

‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत शंकरची भूमिका साकारणार आहे अभिनेता रोहित परशुराम. हा निवेदिता सराफांचा ऑनस्क्रीन जावई आहे. यापूर्वी तो ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकला होता. अभिनेत्याने आता नव्या मालिकेतून झी मराठीवर दमदार कमबॅक केलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मालिकेत त्याची अन् गौरीची लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

मात्र, काही नेटकऱ्यांनी रोहितची एन्ट्री पाहून मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. अप्पी आमची कलेक्टर मालिकेत मुख्य नायिका अप्पी कलेक्टर झाली होती, आणि आता ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये सुद्धा गौरीचं कलेक्टर व्हायचं असं स्वप्न असतं. त्यामुळे नेटकऱ्यांनी याला नेहमी कलेक्टर बायकोच मिळते! अशा प्रतिक्रिया रोहितच्या एन्ट्रीवर दिल्या आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्यासह ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये ट्विंकल यादव ( गौरी ), रोहित परशुराम ( शंकर ), स्मिता सरवदे ( मातोश्रींची भूमिका साकारण्याची शक्यता ), संजय कुलकर्णी, साक्षी गांधी, एकता लब्दे हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

दरम्यान, १५ जूनपासून ‘कृष्णाईच्या लेकी’ ही नवीन मालिका सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येईल.