Krushnaichya Leki upcoming twist: झी मराठी वाहिनीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील कृष्णाई आणि तिच्या लेकी त्यांचे स्वभाव, त्यांची खानावळ यांमुळे लक्ष वेधून घेत असतात. त्याबरोबरच, मातोश्री, इंदुराणी, शंकर व त्याचे मित्रही वेळोवेळी लक्ष वेधून घेत आहेत.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे कृष्णाई आणि इंदुराणी एकमेकींच्या सवती आहेत. इंदुराणी कृष्णाईला त्रास देण्यासाठी अनेक कट-कारस्थाने करीत असते. कृष्णाईचा अपमान व्हावा यासाठी सतत प्रयत्न करत असते. तिची खानावळीची जागा बळकावण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून ती प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये ती पुन्हा एकदा कृष्णाईचा अपमान करणार असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, कृष्णाईची लेक गौरी तिला सडेतोड उत्तर देणार आहे.
झी मराठी वाहिनीने कृष्णाईच्या लेकी या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, मातोश्री इंदुराणी व कृष्णाईला सांगतात की, पंचायतीचा निर्णय होईपर्यंत तुम्ही एकमेकींना भेटायचं नाही. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, रिक्षा एका घरासमोर थांबते. कृष्णाई रिक्षा चालवणाऱ्याला विचारते, तुम्ही आम्हाला इकडे कुठे आणलंत? तितक्यात गोरी रिक्षातून खाली उतरते आणि समोर असलेल्या घराकडे बघते, तर त्यावर इंदुराणी महाल, असे लिहिल्याचे दिसते.
गौरी व कृष्णाईच्या हातात मोठे पातेले असल्याचे दिसत आहे. ते घेऊन जात असताना गौरी कृष्णाईला म्हणते, “त्या इंदुराणीनं मुद्दाम केलं आहे.” प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, इंदुराणी कृष्णाईला म्हणते, “कृष्णाराणी, तेवढी खरकटी ताटं उचलते का?” ते ऐकल्यानंतर गौरीला राग येतो. ती इंदुराणीला रागाने म्हणते, “माझी आई इथं प्रसाद द्यायला आली आहे. खरकटी ताटं उचलायला आली नाही.” पुढे ती असे म्हणते, “स्वत:च्या पोरालासुद्धा तुझी ओळख दाखवता आली नाही, मग बघ तुझी लायकी काय आहे.”
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘गौरी इंदुराणीला तिची खरी जागा दाखवणार’, अशी कॅप्शन दिली आहे. दरम्यान, आता मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
