‘झी मराठी’ वाहिनीवर ८ जुलै २०२४ रोजी ‘लाखात एक आमचा दादा’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेच्या माध्यमातून नितीश चव्हाण आणि दिशा परदेशी यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळाली. मात्र, काही दिवसांपूर्वीच दिशा परदेशीने ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतून एक्झिट घेतली.
आजारपणामुळे तिने मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. दिशा अनेक महिन्यांपासून UTI या आजारामुळे त्रस्त होती. याबद्दल ती सांगते, “आमच्या मालिकेचं शूटिंग साताऱ्याच्या एका गावात होतं. जेव्हा मी शूटिंगसाठी घरून निघाले तेव्हा माझं वजन ५७ किलो होतं. जेव्हा मी ५-६ महिन्यांनी घरी परत आले, तेव्हा माझं वजन ४४ किलो झालेलं होतं. त्यामुळे या आजारात वजन खूप कमी होतं. वजन एवढ्या झपाट्याने कमी झाल्यामुळे प्रोडक्शन आणि चॅनेलला सुद्धा समजलं की नक्कीच ही मोठ्या त्रासात आहे. UTI चं निदान झाल्यावर मला डॉक्टरांनी विशिष्ट प्रकारचं डाएट सुद्धा फॉलो करण्यासाठी दिलं होतं. या सगळ्या गोष्टी मी केल्या पण, एका वेळेनंतर आपल्याला प्रकृतीकडे जास्त लक्ष देऊन थांबणं गरजेचं वाटतं.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मला UTI ( Urinary Tract Infection ) हा आजार कॉमन वॉशरूम वापरल्यामुळे झाला. तिथे स्वच्छता नावाला होती. प्रत्येकाच्या शरीराला त्या गोष्टी सूट होतील असं नाहीये. सेटवर सगळ्या महिलांसाठी कॉमन वॉशरूम होतं, मी माझ्यासाठी वेगळी सोय करा अशी मागणी करू शकत नव्हते. स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घेतली नाहीतर महिलांना युटीआय या आजाराचा सामना करावा लागतो. या आजाराबद्दल अनेक महिलांना आजही माहिती नाहीये. सुरुवातीला अनेकजणी दुर्लक्ष करतात पण, नंतर हा आजार आणखी वाढू शकतो. मला नंतर रोज ताप यायला लागला होता. रोज पहाटे ताप, प्रायव्हेट जागेवर जळजळ…या सगळ्यामुळे मी प्रचंड अशक्त झाले होते. माझं वजनही कमी झालं होतं.”
“तेलकट, तिखट, मसालेदार असे पदार्थ UTI झाल्यावर खायचे नसतात. याशिवाय नॉनव्हेज सुद्धा खायचं नसतं. जर तुम्ही योग्य काळजी घेतली नाही तर, हा आजार अनेकांसाठी जीवघेणाही ठरू शकतो…माझ्या काही मैत्रिणींनी या आजाराकडे वेळीच लक्ष दिली नाही आणि त्यांना पुढे जाऊन २ महिने बेडरेस्ट घ्यायला डॉक्टरांनी सांगितलं होतं. मला या मालिकेच्या निर्मात्या श्वेता शिंदेंनी खूप मदत केली. स्त्रीरोग तज्ज्ञांकडे नेलं. मी गोळ्या घेतल्या, आराम केला पण, पुन्हा तेच…मी माझ्या बाजूने सगळी काळजी घेतली. प्रोडक्शनने सुद्धा माझी काळजी घेतली. पण, हे सगळं करून परत तेच वॉशरूम वापरावं लागायचं ज्यामुळे या सगळ्या आजाराची सुरुवात झाली होती. त्यामुळे थोडे दिवस गेल्यावर मला स्वत:साठी निर्णय घेऊन आराम करणं गरजेचं वाटलं. मी ३ महिने सेटवर उपचार घेतले..आताही ट्रिटमेंट सुरू आहे. हळुहळू मी यातून बरी होतेय.” असं दिशा परदेशीने सांगितलं.
दरम्यान, दिशाने एक्झिट घेतल्यावर आता तिच्याऐवजी तुळजाची भूमिका अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर साकारत आहे.