Lakshmi Niwas upcoming twist: ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत सतत काही ना ट्विस्ट येत असतात. त्यामुळेच मालिकेत पुढे काय होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली असते. लक्ष्मी, भावना, जान्हवी यांच्या आयुष्यात नेहमी चढ-उतार पाहायला मिळतात. त्या खंबीरपणे येणाऱ्या समस्यांना सामोरे जातात. या मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळेच आता ही मालिका दुपारी प्रदर्शित होत असली तरी या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे टीआरपीवरुन समजते.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे, लक्ष्मी व श्रीनिवास यांना पाच मुले आहेत. जान्हवी, भावना, मंगल, संतोष व हरीश ही त्यांची पाच मुले वेगवेगळ्या स्वभावाची आहेत. याबरोबरच, त्यांनी व्येंकीलाही मुलगा मानले आहे. या सगळ्यांची लग्ने झाली आहेत.
संतोष हा लोभी आहे. स्वार्थी आहे. तो पैशांसाठी काहीही करू शकतो. मंगलसुद्धा लोभी आहे. हरीश हा नोकरी करत नाही. त्याला व्यवसाय करायचा आहे. पण त्याला त्यात यश मिळत नाही. जान्हवी व भावना या गुणी मुली आहेत. आई-वडिलांना त्रास होऊ नये यासाठी अनेक गोष्टी करतात. जरी त्यांच्या आयुष्यात अडचणी असल्या तरी त्यामुळे आई-वडील दुखावले जाऊ नयेत याची त्या काळजी घेतात.
जान्हवी व जयंतचे लग्न झाले होते. मात्र, लग्न झाल्यानंतर जयंतने जान्हवीला त्रास दिला. तो तिच्याशी विक्षिप्तपणे वागला. त्याच्या त्रासाला कंटाळून, त्याच्यापासून दूर जाण्यासाठी जान्हवीने पाण्यात उडी मारली होती. त्यानंतर ती अनेक दिवस विश्वाच्या घरात तनुजा या नावाने राहिली होती. जेव्हा ती तिच्या घरच्यांसमोर आली तेव्हा तिला काहीच आठवत नव्हते. तिचे लग्न झाले होते, भावनाचे लग्न झाले हे तिला आठवत नव्हते. इतकेच काय तर विश्वा तिचा जवळचा मित्र आहे, हेही तिला आठवत नव्हते. या सगळ्यात ती पुन्हा जयंतच्या प्रेमात पडली. विश्वाने तिला वेळोवेळी समजवण्याचा, तिला तिचा भूतकाळ आठवून देण्याचा प्रयत्न केला. पण. तरीही जान्हवीने त्याचे ऐकले नाही. जान्हवीने पुन्हा जयंतशी लग्नगाठ बांधली.
“मला सगळं काही…”
आता मात्र मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की विश्वा व जान्हवी एकमेकांशी बोलत आहेत. त्यावेळी जान्हवी विश्वाला म्हणते, “माझी मेमरी परत आली आहे. मला सगळं काही आठवतंय. मला जयंतवर सूड उगवायचा आहे आणि म्हणून मी त्याच्याशी पुन्हा लग्न केलं.” जान्हवीचं बोलणं ऐकून विश्वाला धक्का बसतो. तो तिला म्हणतो, “ज्या जयंतपासून सुटका करण्यासाठी तू पाण्यात उडी मारलीस, त्याच जयंतच्या कचाट्यात पुन्हा सापडू लागलीस…?” विश्वा व जान्हवी बोलत असताना जयंत त्यांना पाहत असल्याचे दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “विश्वाला सत्य कळणार पण जयंतपासून जान्हवीला कोण वाचवणार?”, अशी कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, लक्ष्मी निवास मालिकेत नेमकं काय घडणार? जान्हवी तिचा सूड कसा घेणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
