Zee Marathi Savlyachi Janu Savali : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या १३ एप्रिलपासून ‘आपली दुपार’ हा नवीन सेगमेंट सुरू होईल. या अंतर्गत दोन लोकप्रिय मालिकांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ‘लक्ष्मी निवास’ मालिका आता दुपारी दीड ते अडीच अशी एक तास प्रसारित केली जाईल. तर, ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका दुपारी १ वाजता ऑन एअर होईल. याचा प्रोमो नुकताच ‘झी मराठी’कडून शेअर करण्यात आला आहे. पण, हा प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांच्या मनात एका वेगळ्याच गोष्टीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
नेहमी साडी नेसून वावरणाऱ्या सावलीचा या प्रोमोमध्ये काहीसा नवीन लूक पाहायला मिळतोय. ती साध्या अन् सुंदर ड्रेसमध्ये दिसतेय. याशिवाय सावलीला “आई…” अशी हाक मारत एक चिमुकला तिच्याजवळ धावत येताना दिसतोय. याचाच अर्थ ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेची वेळ तर बदलली जाणार आहे. पण, याचबरोबर मालिकेत लीप येण्याची दाट शक्यता आहे.
सावलीजवळ हा चिमुकला धावत येतो आणि आई हाक मारत तिला मिठी मारतो. यानंतर सावली सुद्धा त्याला उचलून घेते असं प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय. पुढे, हा चिमुकला म्हणतो, “आता दुपारी खायचं-प्यायचं…एकदम चिल करायचं आणि पोट भरेपर्यंत टीव्ही पाहायचा”
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत साईराज येणार?
या चिमुकल्याची भूमिका प्रसिद्ध बालकलाकार साईराज केंद्रे साकारणार आहे. “आमच्या पप्पांनी गणपती आणला” या गाण्यामुळे साईराजला घराघरांत लोकप्रियता मिळाली होती. यानंतर तो झी मराठीच्या अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत झळकला. याशिवाय साईराजने नुकत्याच ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या सिनेमातही अमेय वाघच्या ऑनस्क्रीन मुलाची भूमिका साकारली होती.
आता ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत साईराजची एन्ट्री होण्याची दाट शक्यता आहे. आता त्याची एन्ट्री केव्हा होईल, याची माहिती लवकरच ‘झी मराठी’कडून दिली जाईल. या अनोखा ट्रॅक पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर आहेत…तशा कमेंट्सही त्यांनी प्रोमोवर केल्या आहेत.
दरम्यान, ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये प्राप्ती रेडकर, साईंकीत कामत, मेघा धाडे, सुलेखा तळवलकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
