Zee Marathi : सध्या छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. या मालिका घराघरांत पाहिल्या जातात. त्यामुळेच आघाडीच्या वाहिन्यांमध्ये दर आठवड्यात टीआरपीसाठी जोरदार चुरस रंगलेली असते. याशिवाय गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक दमदार कलाकारांनी टेलिव्हिजनवर पुनरागमन केल्याचं पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर आता ‘झी मराठी’ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कितीही नव्या मालिका सुरू झाल्या तरीही प्रेक्षक जुन्या सदाबहार मालिकांना, त्यांच्या शीर्षक गीतांना आजही मिस करतात. ‘जुनं ते सोनं’ असं म्हणत अनेक जुन्या मालिकांची शीर्षकगीतं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच जुन्या मालिकांच्या चाहत्यांसाठी ‘झी मराठी’ने एक मोठा निर्णय घेतला आहे.

आता लवकरच रात्रीच्या सत्राप्रमाणे वाहिनीवर दुपारचं सत्र सुरू करण्यात येणार आहे. या सत्रात कोणत्याही नव्या नव्हे तर जुन्या गाजलेल्या मालिका प्रसारित केल्या जाणार आहेत. ‘झी मराठी दुपार’ या नव्या सत्राची सुरुवात ‘माझी तुझी रेशीमगाठ’ आणि ‘लागिरं झालं जी’ या दोन मालिकांपासून होणार आहे.

“आई, आजी ऐकलंत का…२२ डिसेंबरपासून येतेय आपल्या हक्काची ‘झी मराठी दुपार’ सलग २ तास… ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका दुपारी ३ वाजता आणि ‘लागिरं झालं जी’ दुपारी ४ वाजता प्रसारित केली जाईल.” असं सांगत या दुपारच्या सत्राला २२ डिसेंबरपासून सुरुवात होणार असल्याचं वाहिनीने जाहीर केलं आहे. या दोन्ही मालिका सलग २ तास प्रसारित केल्या जातील.

प्रेक्षकांनी या निर्णयावर आनंदाचा वर्षाव केला आहे. बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा जुन्या मालिका पाहायला मिळणार यामुळे प्रेक्षक प्रचंड आनंदी आहेत. “आता हे सत्र असंच सुरू ठेवा….आम्हाला अन्य काही वेगळ्या मालिका सुद्धा पाहायच्या आहेत”, अशी विनंती प्रेक्षकांकडून कमेंट्समध्ये करण्यात येत आहे.

दरम्यान, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत प्रार्थना बेहेरे, बालकलाकार मायरा वायकुळ आणि प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर ‘लागिरं झालं जी’ या सुपरहिट मालिकेत शिवानी बावकर आणि नितीश चव्हाण यांची जोडी झळकली होती.