Zee Marathi New Serial DeepJyoti Promo : ‘झी मराठी’ वाहिनीने काही महिन्यांपूर्वी दोन नव्या मालिकांची घोषणा केली होती. यापैकी ‘सनई चौघडे’ मालिका नुकतीच ऑन एअर झाली. यानंतर आता सर्वांना प्रतीक्षा आहे ‘दीपज्योती’ या नव्याकोऱ्या मालिकेची…यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता प्रसाद जवादे यांची जोडी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये ‘दीपज्योती’ची तारीख अन् प्रसारणाची वेळ जाहीर करण्यात आली आहे.
‘दीपज्योती’ मालिका येत्या १३ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका रात्री ८ वाजता प्राइम स्लॉटला प्रसारित केली जाईल. यामध्ये प्रेक्षकांना तीन प्रेमळ बहिणी आणि एक भाऊ यांच्या आपुलकीने बांधलेल्या नात्याची अनोखी गोष्ट पाहायला मिळणार आहे.
‘दीपज्योती’मध्ये झळकणार ‘हे’ कलाकार
‘दीपज्योती’मध्ये पूर्वा कौशिक आणि प्रसाद जवादे यांच्यासह लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. यापूर्वी त्यांनी ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत साकारलेली डॅडींची भूमिका सर्वत्र तुफान गाजली होती. त्यामुळे डॅडींना पुन्हा एकदा डॅशिंग अंदाजात पाहून प्रेक्षक सुद्धा खूश झाले आहेत. गिरीश ओक ‘दीपज्योती’ मालिकेत कुटुंबाचे प्रमुख पुरुषोत्तम ही भूमिका साकारतील.
ओमकार गोवर्धन, ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ फेम अभिनेत्री मानसी सुभाष, अनुप बेलवलकर हे कलाकार सुद्धा या नव्या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
‘दीपज्योती’च्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना बहीण-भावाचं कुटुंब सुखी आयुष्य जगताना दिसतंय. तर, दुसरीकडे मालिकेचा नायक दीप दारूच्या आहारी गेल्याचं पाहायला मिळतंय. दीप हा श्रीमंत घरातील मुलगा असतो. तर, याउलट ज्योतीचा ( नायिका ) भाऊ रिक्षा चालवून आपलं कुटुंब सांभाळत असतो. प्रोमोच्या शेवटी ज्योतीच्या भावाचा आणि बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याचा अपघातात मृत्यू होतो असं पाहायला मिळतंय. आता यानंतर ज्योती संपूर्ण घर कसं सावरणार याचा प्रवास ‘दीपज्योती’च्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
कोणती मालिका संपण्याची शक्यता?
‘दीपज्योती’ मालिकेला आठ वाजताचा स्लॉट दिल्यामुळे सध्या या स्लॉटला सुरू असलेल्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचं काय होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
अनेकांनी ‘लक्ष्मी निवास’ संपेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर, काही लोकांना ‘लक्ष्मी निवास’ची वेळ बदलली जाईल असंही वाटतंय. लवकरच ‘झी मराठी’ वाहिनी ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचं काय होणार याबाबत अधिकृत घोषणा करेल. काही नेटकऱ्यांनी “लक्ष्मी निवास बंद करू नका” अशीही विनंती कमेंट्समध्ये केली आहे.
