Zee Marathi Dhaktya Sunbai New Serial Promo : ‘कोठारे व्हिजन’ची निर्मिती असलेली ‘धाकट्या सूनबाई’ ही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यावेळी नवोदित अभिनेत्री चिन्मयी मोरे ‘धाकट्या सूनबाई’मध्ये प्रमुख भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. आता या मालिकेची अन्य स्टारकास्ट सुद्धा दुसऱ्या एका प्रोमोतून रिव्हिल करण्यात आली आहे.

‘धाकट्या सूनबाई’ मालिकेत छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता मंदाज जाधव प्रमुख भूमिका साकारणार आहे. मंदारचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वी ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकांमध्ये मंदार झळकला होता. आता ‘धाकट्या सूनबाई’च्या निमित्ताने अभिनेता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.

‘धाकट्या सूनबाई’ मालिकेत प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर देखील झळकणार आहेत. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये त्यांचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळतोय. याशिवाय ‘पारू’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अहिल्यादेवी आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय. अभिनेत्री मुग्धा कर्णिक सुद्धा या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. मानसी सुरेश, अमित फाटक अशा लोकप्रिय कलाकारांची या मालिकेत मांदियाळी आहे.

‘धाकट्या सूनबाई’ ही मालिका येत्या २८ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दररोज सायंकाळी ६:३० वाजता ही सिरियल प्रसारित केली जाईल. मंदार-चिन्मयीच्या नव्या जोडीला आणि सविता मालपेकर, मुग्धा कर्णिक यांना पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहून प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, ‘धाकट्या सूनबाई’ ही मालिका २८ सप्टेंबरपासून दररोज सायंकाळी ६:३० वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाईल.