Zee Marathi Serial Krushnaichya Leki : लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांची प्रमुख भूमिका असलेली ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका येत्या १५ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही कथा आहे कृष्णाईची जी आयुष्यातील अनेक संकटांचा सामना करत आपल्या मुलींना योग्य संस्कार, शिक्षण आणि आत्मविश्वास देऊन घडवते. तीन मुलींच्या जन्मानंतर कृष्णाईच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं. समाजाने तिला सतत कमी लेखलं पण, या परिस्थितीतही कृष्णाई कधीच खचली नाही. तिची स्वत:ची खानावळ असते.

कृष्णाईला शारदा, गौरी आणि सौदामिनी अशा तीन मुली आहेत. शारदा शांत, संयमी, आईप्रमाणे समजूतदार आणि जेवण बनवण्यात अगदी सुगरण आहे. दुसरी मुलगी गौरी ही बंडखोर स्वभावाची असून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धैर्य तिच्यात आहे. कलेक्टर व्हायचं असं तिचं स्वप्न असतं. तर, कृष्णाईची सर्वात धाकटी मुलगी सौदामिनी ही स्वप्नाळू, महत्त्वाकांक्षी आणि करिअर केंद्रीत आहे. आता या मालिकेतील अभिनेत्रींची ओळख झाल्यावर यामध्ये हिरोची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला होता. अखेर या लोकप्रिय अभिनेत्याची पहिली झलक सर्वांसमोर आली आहे.

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता रोहित परशुराम ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याच्या भूमिकेचं नाव आहे शंकर…शंकरची स्टाइल एकदम भारी आणि त्याचा रुबाबही एकदम भारी आहे. रोहितला पुन्हा एकदा डॅशिंग लूकमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक सज्ज झाले आहेत.

‘झी मराठी’ने रोहितचा फेस रिव्हिल न करता एक लहानसा व्हिडीओ शेअर केला आहे. यातही प्रेक्षकांनी त्याला अगदी अचूक ओळखलंय.

दरम्यान, निवेदिता सराफ यांच्यासह ट्विंकल यादव, रोहित परशुराम, स्मिता सरवदे, संजय कुलकर्णी, साक्षी गांधी, एकता लब्दे या कलाकारांची दमदार फळी प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. सामाजिक विषयांना स्पर्श करणारी ही कथा लेखक तेजेश घाटगे यांनी लिहिली असून मालिकेचं दिग्दर्शन अनिकेत साने करणार आहेत. ओशन फिल्मने या मालिकेची निर्मिती केली असून, संवेदनशील विषयांची प्रभावी मांडणी आणि वास्तवाशी जवळीक असलेले कथानक यामुळे ‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करेल.

दरम्यान, ‘कृष्णाईच्या लेकी’ ही नवीन मालिका १५ जूनपासून संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर प्रसारित केली जाईल.