Zee Marathi New Serial Krushnaichya Leki Promo : छोट्या पडद्यावर येत्या काही दिवसांत अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘झी मराठी’ने काही दिवसांपूर्वीच ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेची घोषणा केली होती. यामध्ये मुख्य भूमिका कोण साकारणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर ‘कृष्णाईच्या लेकी’चा पहिला जबरदस्त प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ या मालिकेच्या माध्यमातून झी मराठीवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

निवेदिता सराफ यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी त्यांनी झी मराठीच्या ‘अग्गंबाई सूनबाई’ आणि ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. निवेदिता यांनी साकारलेली बबड्याची आई घराघरांत लोकप्रिय झाली होती. या पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. आता ही ‘बबड्याची आई’ कृष्णाई होऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये नायिका घरातील सगळी जबाबदारी खंबीरपणे सांभाळताना दिसतेय. ती म्हणते, “तुम्हाला म्हणून सांगते…मी लहानपणापासून ऐकलंय, चूल अन् मूल बाईकडं…आणि घराची जबाबदारी पुरुषाकडे! पण, माझ्या नशिबाचा डाव पलटला…वंशाला दिवा नाही म्हणून नवऱ्याने हात झटकला. त्या दिवसापासून माझ्या लेकींची आई पण मीच आणि बाप सुद्धा मी! त्यांना सांगितलं पाहिजे हवं तेवढं शिका आणि जगात ताठ मानेने जगा…कोणीतरी सांगितलंय पोटची बेटी धनाची पेटी, ज्याला समजली त्याने मनापासून जपली.”

‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेची तारीख अन् वेळ अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मात्र, निवेदिता यांच्यासह मालिकेत कोण-कोण झळकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘कृष्णाईच्या लेकी’ ही मालिका हिंदीतील ‘गंगा माई की बेटियां’ आणि मूळ तेलुगू मालिका ‘राधाम्मा कुथुरु’चा रिमेक आहे. आता या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात आणि महत्त्वाचं म्हणजे ‘झी मराठी’ या मालिकेला कोणता स्लॉट देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांनी निवेदिता सराफ यांना प्रमुख भूमिकेत पाहताच या प्रोमोवर कौतुकाचा व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आता ही नवीन मालिका सुरू झाल्यावर जुनी कोणती सिरियल संपणार अथवा कोणत्या मालिकेची वेळ बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.