Zee Marathi Sanai Chaughade Promo : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या १६ मार्चपासून ‘सनई चौघडे’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ८:३० वाजता प्राइम स्लॉटला ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. ‘सनई चौघडे’मध्ये मेघना एरंडे, चिन्मयी साळवी, सुहास शिरसाट हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील. तर, ‘सनई चौघडे’चा हिरो आहे लोकप्रिय अभिनेता राज हंचनाळे. राजच्या भूमिकेचं नाव आहे जय खानोलकर. त्याच्या आयुष्यात फक्त तीन स्त्रिया महत्त्वाच्या आहेत – त्याची आजी, आई आणि बहीण. ज्याच्या ऑफिसमध्ये स्त्रियांना देखील प्रवेश नाहीये. अशा या जय खानोलकरच्या आईच्या भूमिकेत कोण झळकणार पाहुयात…

‘सनई चौघडे’ मालिकेत ‘वादळवाट’ फेम लोकप्रिय अभिनेत्री अदिती सारंगधर जय खानोलकरच्या आईच्या भूमिकेत झळकणार आहे. तेजस्विनी खानोलकर’ हे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. या भूमिकेबद्दल अदिती म्हणाली, “मी ‘सनई चौघडे’ मालिकेत तेजस्विनी खानोलकर ही भूमिका साकारतेय. नाव जसं भारदस्त आहे तशीच माझी व्यक्तिरेखा सुद्धा आहे. माझ्या सुदैवाने मला नेहमीच छान भारदस्त भूमिका मिळालेल्या आहेत. तेजस्विनीच्या मनात बऱ्याच वर्षांपासून अनेक गोष्टी साचलेल्या आहेत. तिने बरंच काही भोगलंय, अनुभवलंय…तिच्या मनावर सुद्धा या सगळ्याचा परिणाम झालाय. तेजस्विनी कायम आपल्या कुटुंबासाठी जीव ओवाळून टाकते. तिचं आपल्या मुलावर जीवापाड प्रेम आहे. ‘झी मराठी’वर मी नायिकेची, खलनायिकेची भूमिका साकारलीये… पण आता पहिल्यांदा मी आईची भूमिका साकारणार आहे.”

अदिती या भूमिकेसाठी कशी निवड झाली हे सांगताना पुढे म्हणाली, “मी आता स्वतः आई असल्यामुळे मला सशक्त भूमिका हवी होती. तेजस्विनीची भूमिका अगदी तशीच आहे, जिचं स्वतःचं काहीतरी म्हणणं आहे, तिच्याभोवती बऱ्याच गोष्टी फिरत आहेत. खरं सांगायचं तर आईची भूमिका करायला माझी मुळात तयारी नव्हती. पण त्यानंतर खोलवर विचार करून माझ्या तत्वांचा सांभाळ करत, ही मी भूमिका स्वीकारली. अधिक सांगायच झालं तर राजू सावंत ( दिग्दर्शक-निर्माते ) यांच्याबरोबर मला मनापासून काम करायचं होतं.”

“आधीच्या भूमिकांपेक्षा ही भूमिका कशी वेगळी आहे हे सांगायचं झालं तर ‘वादळवाट’ मालिकेतील रमा चौधरी, ‘हम बने तुम बने’ मालिकेतील तुलिका, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील मालविका आणि आता ‘सनई चौघडे’ मालिकेती तेजस्विनी… प्रत्येक भूमिकेचे काहीतरी कंगोरे असतात, प्रत्येक भूमिकेचं काहीतरी खास वेगळेपण असतं, दिसण्यामध्ये वागण्यामध्ये वावरण्यामध्ये. मी आजवर अनेक मालिका केलेल्या आहेत तर मी नक्की असं सांगेन की, लेखकापासून प्रत्येकानेच माझ्या भूमिकेतलं वेगळेपण जपलेलं आहे.”

aditi
अदिती सारंगधर – तेजस्विनी खानोलकर

“या मालिकेतील काही सहकलाकारांशी माझी आधीपासून मैत्री आहे. यापैकी एक म्हणजे मेघनाला मी फार पूर्वीपासून ओळखते. त्यामुळे ती तर आहेच माझी खास…याशिवाय आमची निर्माती मनस्वीत… ती फार गोड मुलगी आहे. बरेच लोक ओळखीचे आहेत त्यामुळे माझ्या लोकांमध्येच मी काम करणार आहे. माझ्यामते, सहकलाकारांबरोबर काम करता-करता त्यांच्याशी मैत्री होतेच, पण कलाकारांनी आपल्या युनिटला सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे. युनिटचा आनंदही तेवढाच महत्वाचा असतो.” असं अदिती सारंगधरने सांगितलं.