Zee Marathi New Serial Promo Sanai Chaughade : ‘झी मराठी’ वाहिनीने काही दिवसांपूर्वीच ‘दीप ज्योती’ आणि ‘सनई चौघडे’ या दोन नव्या मालिकांची घोषणा केली होती. या दोन्ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतील असं जाहीर करण्यात आलं होतं. आता यापैकी ‘सनई चौघडे’ मालिकेचा ग्रँड प्रोमो नुकताच ‘झी मराठी’कडून शेअर करण्यात आला आहे. या नव्या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना मेघना एरंडे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकताना दिसणार आहे.

अभिनेत्री मेघना एरंडे ‘सनई चौघडे’ मालिकेत चार मुलींच्या आईची भूमिका साकारणार आहे. आपल्या मुलींचं थाटामाटात लग्न व्हावं ही या भाबड्या आईची इच्छा असते. चार लेकींची ही आई सतत जावयाच्या शोधात असते. आता या आईला तिच्या मनासारखा जावई सापडेल का? याचा उलगडा मालिका सुरू झाल्यावर होईल.

‘सनई चौघडे’मध्ये मुलींच्या बाबांची भूमिका अभिनेते सुहास शिरसाट साकारणार आहेत. सुहास शिरसाट यांनी यापूर्वी ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत दत्ताची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली होती.

ज्या चार मुलींच्या आयुष्यावर हे कथानक आधारलेलं आहे, त्यांच्या भूमिका ‘सनई चौघडे’ मालिकेत कोणत्या अभिनेत्री साकारणार? हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता. यापैकी पहिली अभिनेत्री आहे चिन्मयी साळवी. यापूर्वी तिने ‘वागळे की दुनिया’ या हिंदी मालिकेत काम केलेलं आहे. तर, जुई गोगरी, रुची नेरुरकर या अभिनेत्रींच्या सुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.

‘सनई चौघडे’ मालिकेचा नायक असेल लोकप्रिय अभिनेता राज हंचनाळे. राजने यापूर्वी ‘झी मराठी’च्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत राणादाच्या धाकट्या भावाची भूमिका साकारली होती. यानंतर तो ‘स्टार प्रवाह’च्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सुद्धा मुख्य नायकाच्या भूमिकेत झळकला होता. आता राज पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकून घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

दरम्यान, ‘सनई चौघडे’ मालिकेची तारीख अन् वेळ ‘झी मराठी’ने अद्याप जाहीर केलेली नाहीये. लवकरच या मालिकेच्या प्रसारणाची वेळ अधिकृतरित्या जाहीर केली जाईल. आता या मालिकेला कोणता स्लॉट मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.