Zee Marathi Sanai Chaughade Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या काही दिवसांत अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘सनई चौघडे’ या नव्या मालिकेला वाहिनीने साडेआठचा प्राइम स्लॉट दिला असून यामध्ये दमदार कलाकारांची मांदियाळी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. येत्या १६ मार्चपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘सनई चौघडे’ मालिकेत लोकप्रिय अभिनेता राज हंचनाळे प्रमुख भूमिका साकारणार आहे. यापूर्वी त्याने तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणादाच्या धाकट्या भावाची भूमिका साकारली होती. राजने साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावली. आता राज दमदार, स्टायलिश अशा जय खानोलकरच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जय खानोलकर ही व्यक्तिरेखा कणखर, शिस्तप्रिय आणि तितकीच भावनिक आहे. या भूमिकेबद्दल, ऑडिशन प्रक्रियेबद्दल, सहकलाकार आणि त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल राजने मनमोकळ्या गप्पा मारल्या.
राज हंचनाळे म्हणाला, “माझ्या व्यक्तिरेखेचं नाव जय खानोलकर आहे. तो खूप प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि थोडासा अॅटिट्युड असलेला आहे. वरून पाहता तो थोडा रागीट वाटू शकतो, पण मनाने खूप हळवा आहे. त्याच्या आयुष्यात फक्त तीन स्त्रिया महत्त्वाच्या आहेत – त्याची आजी, आई आणि बहीण. त्याचं स्पष्ट मत आहे की इतर गोष्टींमध्ये न अडकता माणसाने फक्त कामावर लक्ष केंद्रीत करावं. त्याने स्वतःच्या मेहनतीने शून्यातून स्वतःचं विश्व उभं केलं आहे, त्यामुळे त्याला स्वत:चा अभिमान आहे, पण गर्व नाही. तो सरळ, स्पष्टवक्ता आणि कामावर लक्ष देणारा आहे.”
जय खानोलकरच्या ऑफिसमध्ये महिला कर्मचाऱ्यांना काम करण्याची परवानगी नाही. त्याच्या आयुष्यात अनेक गुपितं आहेत, जी मालिकेच्या प्रवासात उलगडत जातील.
राज पुढे सांगतो, “या भूमिकेसाठी माझी निवड झाली म्हणजे मला प्रोडक्शन हाऊसमधून ऑडिशनसाठी कॉल आला. मला नंतर समजलं की राजू सावंत दिग्दर्शक आणि निर्माते आहेत… ही आमच्या प्रोडक्शनची पहिली सिरीयल आहे आणि अर्थात ही मालिका झी मराठीवर आहे, सो हे कॉम्बिनेशन… एकदम भन्नाट वाटलं. मी पहिली ऑडिशन घरातून पाठवली होती. ती सगळ्यांना खूप आवडली. त्यानंतर मला सेटवर तीन-चार राऊंडसाठी बोलावण्यात आलं सहकलाकारांबरोबर ऑडिशन दिली. माझ्यासाठी हा वेगळा अनुभव होता, कारण या आधी साधारण एक-दोन ऑडिशनमध्ये निवड होत असे. या भूमिकेसाठी मात्र चार-पाचवेळा ऑडिशन झाल्या. तेव्हा मनात थोडे प्रश्न आले, पण आता मागे वळून पाहताना वाटतं की योग्य कलाकार निवडण्यासाठी त्यांनी काटेकोर प्रयत्न केले. त्या प्रक्रियेचा भाग होण्याचा मला आनंद आहे.”
“कोणतीही भूमिका साकारताना शारीरिक आणि मानसिक तयारी महत्त्वाची असते. जय हा एक प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेला मुख्य नायक आहे. त्याची बॉडी लँग्वेज, स्वॅग, अॅटिट्युड आणि स्टाइल या सगळ्या गोष्टींवर मी विशेष काम करतोय. यासाठी मी दिग्दर्शकांसह चर्चा करून भूमिका अधिक चांगल्या प्रकारे विकसित करण्याचा प्रयत्न करतोय. कारण, जय जरी कठोर वाटत असला तरी मनाने प्रेमळ आहे, हे दाखवणंही महत्त्वाचं आहे. माझ्या आधीच्या भूमिका थोड्या भावनिक आणि गंभीर स्वरूपाच्या होत्या. त्यात ग्रामीण बोली आणि साधी बॉडी लँग्वेज होती. जय खानोलकर मात्र पूर्णपणे वेगळा आहे. त्याची चाल, बोलणं, उभं राहणं सगळंच वेगळं आहे. प्रेक्षकांना माझ्यातला हा बदल नक्कीच आवडेल, असं मला वाटतं.” असं राजने सांगितलं.
‘सनई चौघडे’ मालिकेच्या प्रोमोला सर्वांचा खूप छान प्रतिसाद मिळाला. कास्ट, संकल्पना आणि जयची एन्ट्री प्रेक्षकांना आवडलेली आहे. “स्वामींची इच्छा” या संवादासाठी मला अनेक मेसेज आले. रिक्षावर लिहिलेलं “भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे” हे वाक्यही लोकांना खूप भावलं. प्रेक्षक मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि त्यांच्या अपेक्षांना साजेसं असं काम आम्ही करू, अशा भावना राजने व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, ‘सनई चौघडे’ ही मालिका १६ मार्चपासून दररोज रात्री ८.३० वाजता प्रसारित केली जाईल.
