Yetech Aata Mi Nandayla Usha Nadkarni New Serial : उषा नाडकर्णी छोट्या पडद्यावर कमबॅक करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू होत्या. याशिवाय ‘झी मराठी’ने त्यांचा चेहरा रिव्हिल न करता एक खास प्रोमो शेअर केला होता, त्याने देखील प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. उषा नाडकर्णी नेमक्या कोणत्या मालिकेतून कमबॅक करणार, या मालिकेचं नाव काय असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता प्रेक्षकांना मिळालेली आहेत.

झी मराठीवर लवकरच ‘येतेच आता मी नांदायला’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. त्यांच्या भूमिकेचं नाव आहे ठकुबाई! ‘येतेच आता मी नांदायला’मधून प्रेक्षकांना ‘ठकुबाईचा ठसका’ ‘अनुभवायला मिळणार आहे.

“भलेभले घेतात जिचा धसका, आता दुनिया पाहणार त्या ‘ठकुबाईचा ठसका!” असं कॅप्शन वाहिनीने या प्रोमोला दिलं आहे. या ठकुबाईचा धाक इतका असतो की, ती कायमची सोडून गेलीये ही बातमी ऐकताच गावकरी आनंदी होतात. पण, अचानक तिला शुद्धा येते. “ठकु म्हातारी मेली नाहीये…ती परत आलीये” हे ऐकून गावकरी प्रचंड घाबरतात. तिचा फोटो हटवला जातो, तिला श्रद्धांजली देणारे बॅनर गुंडाळले जातात, बँडवाले पळून जातात…आणि शेवटी ठकुबाई म्हणते, “बघितला ना ठकुबाईचा ठसका…मला भेटायला तयार राहा!”

या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अविनाश नारकरांनी यावर, “वाह-वाह-वाह उषाताई…कमाल…कमाल…कमाल!” तर, मेघा धाडेने यावर कमेंट करत “वाह कमाल आऊ” असं म्हटलं आहे. याशिवाय अभिज्ञा भावे, श्रेया बुगडे, किरण गायकवाड या कलाकारांनीही कमेंट्स करत या नव्या मालिकेच्या प्रोमोचं आणि उषा नाडकर्णींचं कौतुक केलं आहे.

Yetech Aata Mi Nandayla Usha Nadkarni New Serial
प्रोमोवर मराठी कलाकारांच्या कमेंट्स ( Yetech Aata Mi Nandayla Usha Nadkarni New Serial )

‘येतेच आता मी नांदायला’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वाहिनीने अद्याप या मालिकेची लॉन्च डेट जाहीर केलेली नाहीये. आता उषा नाडकर्णी यांच्यासह या मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.