Zee Marathi New Serial Shubh Shravani : ‘झी मराठी’ने काही दिवसांपूर्वीच ‘शुभ श्रावणी’ या नव्या मालिकेची घोषणा केली होती. या सिरियलच्या माध्यमातून प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री वल्लरी विराज वाहिनीवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. यापूर्वी ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेमुळे वल्लरीला घराघरांत प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं होतं. सर्वांची लाडकी ‘लीला’ आता ‘श्रावणी’ होऊन भेटीला येणार आहे. या मालिकेची तारीख अन् वेळ अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे.

वल्लरी विराजसह ‘शुभ श्रावणी’ मालिकेत अभिनेता सुमित विजय प्रमुख भूमिका साकारणार आहे. सुमितने याआधी ‘पक्या, पिंकी आणि साहेब’ आणि ‘विषय हार्ड’ या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच या मालिकेत श्रावणीच्या वडिलांची भूमिका अभिनेते लोकेश गुप्ते साकारणार आहेत. जवळपास ९ वर्षांनी ते छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. लोकेश गुप्ते यांनी याआधी ‘वादळवाट’, ‘या सुखांनो या’, ‘आभास हा’, ‘लज्जा’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांच्यासह या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी, जुई तनपुरे, कोमल शेटे हे कलाकार झळकणार आहेत.

‘शुभ श्रावणी’ मालिका केव्हा ऑन एअर होणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ‘झी मराठी’ने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये या ‘शुभ श्रावणी’ मालिकेची लॉन्च डेट जाहीर करण्यात आली आहे.

‘शुभ श्रावणी’ मालिका १९ जानेवारीपासून दररोज सायंकाळी ७ वाजता प्रसारित केली जाणार आहे. सध्या या स्लॉटला ‘पारू’ मालिका प्रसारित केली जाते. आता ‘शुभ श्रावणी’ मालिका सुरू झाल्यावर ‘पारू’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याची दाट शक्यता आहे. मात्र, याबाबत कलाकारांनी किंवा ‘झी मराठी’ने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

‘शुभ श्रावणी’ मालिकेचा नवीन प्रोमो

श्रावणीची परीक्षा असते…तिला आधीच आवरायला वेळ झालेला असतो. त्यात वडिलांशी सुद्धा तिचं फारसं जमत नसतं. अशातच आसावरी जोशी तिला सांगतात वडील शिक्षणमंत्री आहेत, त्यांची पत्रकार परिषद सुरू आहे… आता त्यांच्यासमोर जाऊ नकोस. यावर श्रावणी ठामपणे त्यांना सांगते, माझ्या वडिलांचा आशीर्वाद घेऊन मी परीक्षेला जाणार! ती खाली बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी येते…पण, त्यांच्या तोंडचे शब्द ऐकून ती पुढे न जाता माघार घेते…नाराज होते. यावेळी मालिकेचा नायक तिला मोठ्या हुशारीने तिच्या वडिलांचं पेन देतो आणि मॅडम मस्त पेपर लिहा असं सांगतो.

दरम्यान, नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. वल्लरीसह संपूर्ण टीमला चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. याचप्रमाणे ‘पारू’ मालिका बंद होणार की तिची वेळ बदलली जाणार? असेही प्रश्न नेटकरी कमेंट्समध्ये विचारत आहेत.