What will Aditya Do To Save Paarus Life: सत्यवान सावित्रीची गोष्ट आजही सांगितली जाते. पतीव्रता म्हणून सावित्रीचा उल्लेख केला जातो. पतीचे प्राण परत आणण्यासाठी सावित्री यमाकडे प्रार्थना करते, अशी ही गोष्ट आहे.
आता ‘पारू’ मालिकेत वटपौर्णिमा साजरी होणार आहे. ही वटपौर्णिमा आदित्य साजरी करणार आहे. ‘पारू’ काही दिवसांपासून दवाखान्यात असून ती बेशुद्ध आहे. आदित्य व पारू एकमेकांच्या प्रेमात असल्याचे समजल्यानंतर पारूच्या वडिलांनी म्हणजेच मारुतीने मोठा निर्णय घेतला होता. त्यांनी खिरीतून पारुला विष दिले होते, कारण मारुतीने वर्षानुवर्षे किर्लोस्करांच्या घरात काम केले आहे. अहिल्यादेवी व संपूर्ण किर्लोस्कर कुटुंबाप्रती त्यांच्या मनात आदर आहे.
किर्लोस्कर कुटुंबावर कोणतेही संकट येऊ नये असे त्यांना वाटते. तसेच, मालक व सेवकाची बरोबरी होऊ शकत नाही, त्यामुळे पारूने आदित्यच्या प्रेमात पडून गुन्हा केला आहे असे त्यांना वाटले, म्हणून त्यांनी कठोर पाऊल उचलले. पारूलादेखील वडिलांनी खिरीमध्ये विष घातल्याचे माहीत असूनही मारुतीच्या हातून तिने ती खीर खाल्ली. जेव्हा आदित्यला याबाबत समजले, तेव्हा त्याने तिला दवाखान्यात दाखल केले. ती अजूनही बेशुद्ध आहे.
पारूचा जीव वाचविण्यासाठी आदित्य व्रत करणार
आता आदित्य पारूचा जीव वाचविण्यासाठी वटपौर्णिमा साजरी करणार आहे. झी मराठी वाहिनीने पारू मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, आदित्य अत्यंत दु:खी आहे. तो एका आजीजवळ बसतो आणि म्हणतो की काय करू काहीच कळत नाही. त्यावर ती आजी त्याला सांगते की सावित्रीने व्रत केलं, सत्यवानाचा जीव वाचविण्यासाठी; बाळा, तुलासुद्धा व्रत करावं लागेल.
पुढे प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, आदित्य वटपौर्णिमा करत आहे. वडाभोवती फेऱ्या मारताना तो मनात म्हणतो, “जसे सावित्रीने तिच्या सत्यवानाचा जीव वाचवला, तसा आज हा सत्यवान त्याच्या सावित्रीचा जीव वाचवणार.” याचदरम्यान पारूला शुद्ध आली असून तिने डोळे उघडल्याचे पाहायला मिळत आहे.
पारू मालिकेचा प्रोमो शेअर करताना पारूसाठी सत्यवान बनून आदित्य वाचवणार का तिचे प्राण? अशी कॅप्शन दिली आहे.
पारूला शुद्ध आल्यानंतर आदित्य त्यांच्या नात्याविषयी घरी सर्वांना सांगणार का, अहिल्यादेवीची त्यावर काय प्रतिक्रिया असणार, यामुळे आदित्य व अहिल्यादेवी, अहिल्यादेवी व पारू यांच्यातील नाते बिघडणार की आईमुळे आदित्य पारूला स्वत:पासून दूर करणार, मारुतीचे पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.