Zee Marathi Paaru Serial : ‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘पारू’ मालिकेत सध्या आदित्य आणि पारूचं नातं बहरत जात असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या दोघांच्या नात्याला पारूच्या वडिलांचा विरोध असतो. याशिवाय या दोघांच्या नात्याचं सत्य अहिल्याला सुद्धा माहिती नसतं.

आदित्य-पारूची लव्हस्टोरी एक पाऊल पुढे कशी जाणार? या दोघांचं लग्न कसं होणार? याबद्दल सगळ्याच प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, त्याआधीच मालिकेत एक मोठा धमाका होणार आहे. पारूच्या आधी मालिकेतील जुनी खलनायिका अहिल्याची सून होऊन किर्लोस्करांच्या घरात एन्ट्री घेणार आहे.

दिशा आणि अनुष्का या दोन्ही बहिणींनी अहिल्यादेवी व तिच्या संपूर्ण कुटुंबीयांविरोधात मोठा कट रचलेला असतो. पण, पारूच्या हुशारीमुळे या दोन्ही कारस्थानी बहिणींचं सत्य अहिल्यासमोर उघड होतं. अनुष्काचा यात जीव जातो तर, दिशा सुखरुप बचावते आणि पळून जाण्यात यशस्वी होते. पण, आता लवकरच ही जुनी नायिका चक्क अहिल्याची सून होऊन किर्लोस्कर वाड्यात येणार आहे.

‘झी मराठी’ वाहिनीने नुकताच “ती परत येतेय…” असं कॅप्शन देत खास व्हिडीओ शेअर केला होता. यावर बऱ्याच नेटकऱ्यांनी ही अभिनेत्री पूर्वा शिंदे असल्याचा अंदाज बांधला होता. अखेर हा अंदाज खरा ठरला असून पूर्वाची पुन्हा एकदा ‘पारू’ मालिकेत एन्ट्री होणार आहे.

किर्लोस्करांच्या वाड्यात दिशा नव्या नवरीसारखी नटून-थटून, माप ओलांडून एन्ट्री घेणार आहे. यानंतर ती ‘होणार सून मी ह्या घरची’ म्हणत तिच्या सासूमॉमसमोर ( दिशा अहिल्याला सासूमॉम हाक मारते ) रुबाब गाजवणार आहे. आता दिशा अहिल्याची सून कशी काय झाली? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. याचं उत्तर प्रेक्षकांना ३० जून ते ३ जुलै यादरम्यान मिळणार आहे.

‘पारू’ मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. काही जणांनी दिशाच्या रिएन्ट्रीवर आनंद व्यक्त केला आहे. तर, अनेकांनी दिशाचं पात्र सारखं मालिकेत येत-जात असतं, पण काही केल्या आदित्य-पारूचं लग्न होत नाहीये अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता दिशाच्या रिएन्ट्रीनंतर मालिकेत कोणता ट्विस्ट येणार, तिचं नेमकं कोणाशी लग्न होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही मालिका रोज सायंकाळी ७.३० वाजता प्रसारित केली जाते.